व्हीएस न्यूज - पुण्यातील एका व्यावसायिकाने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना शिवणे परिसरात घडली आहे. निलेश चौधरी असे या व्यावसायिकाचे नाव असून पुण्यातील शिवणे या ठिकाणी असलेल्या पोकळेनगरमध्ये ते वास्तव्यास होते. कर्जबाजारीपणा, नैराश्य या सगळ्याला कंटाळून त्यांनी दोन मुलींना आणि पत्नीला विष दिले. तसेच स्वतः आत्महत्या केली. नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट निलेश चौधरींच्या खिशात मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. निलेश चौधरी यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता. ते शिवणे या ठिकाणी राहात होते. मात्र कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने आणि नैराश्य आल्याने या व्यावसायिकाने आपल्या कुटुंबासह स्वतःचे आयुष्यही संपवले. पोलिसांना आज सकाळच्या सुमारास ही माहिती मिळाली. निलेश चौधरी ३९ वर्षांचे होते. त्यांनी त्यांची पत्नी नीलम, मुलगी श्रिया आणि दुसरी मुलगी श्रावणी या तिघींना विष दिले. त्यानंतर पंख्याला दोरीने गळफास घेऊन स्वतःचेही आयुष्य संपवले.
निलेश चौधरी यांचा मृतदेह पोलिसांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह बेडरुममध्ये आढळले. या सगळ्यांच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. चारही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कर्जाला कंटाळून निलेश चौधरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली आहे.