व्हीएस न्यूज ः कचरा डेपोवर कचरा वेचण्यासाठी गेलेली दोन मुले डेपोवर असलेल्या 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात पाय घसरून पडून दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना लोणावळा नगरपरिषदेच्या वरसोली कचरा डेपो येथे गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
इम्रान उर्फ सोनू रफिक शेख (वय 14) आणि अस्लम इस्माईल मुजावर (वय-16, दोघेही रा. वाकसई, मुळ गाव उदगीर) असे बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुले एकमेकांची मावसभाऊ आहेत. सोनू याचे वडील रफिक शेख हे कचरा डेपोमध्ये कचरा उचलण्याच्या ठेक्यामध्ये काम करतात आणि डेपोच्या बाजूलाच असलेल्या वाकसई चाळ येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेव्हणीचा मुलगा असलेला अस्लम हा त्यांच्यासोबत लोणावळ्यात आला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सोनू हा अस्लम याच्या सोबत कचरा डेपोमध्ये गेला होता. खड्याच्या जवळ गेल्याने दोघेही पास घसरून पाण्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला.
यातील इम्रान उर्फ सोनू याचा मृतदेह हा लगेच मिळून आला पण अस्लम याचा मृतदेह बराच वेळ सापडत नव्हता. अखेर अस्लम याला शोधण्यासाठी स्थानिक शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी 3.40 वाजता अस्लम याचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गला यश आले. या मोहिमेत शिवदुर्गचे प्रविण देशमुख, अजय शेलार, सागर कुंभार, राजेंद्र कडु, आनंद गावडे, रोहित वर्तक, सागर पडवळ, दिनेश पवार, सुनिल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.