व्हिएस न्युज - काळेवाडी परिसरात एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्याविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११५(२) आणि ७४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे काळेवाडी-थेरगाव सह पिंपरी चिंचवड शहरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
काळेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रथम खबर अहवालातील (एफआयआर) नोंदीनुसार, शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाजवळ असलेल्या स्नॅक्स सेंटरसमोर ही घटना घडली. या प्रकरणात काळेवाडीतील रहिवाशी एका महिलेने तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मच्छिंद्र चिंचोळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) आणि ७४ चा उल्लेख करण्यात आला आहे. कलम ११५(२) हे स्वेच्छेने दुखापत पोहोचविण्याशी संबंधित असून, कलम ७४ हे महिलेच्या विनयशीलतेचा भंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा बळाचा वापर करणे यासंबंधी आहे.
तक्रारदार महिलेचे पती व चिंचोळे हे पूर्वी एकत्र सामजिक कार्यात सक्रीय होते. काही कारणास्तव त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊन ते दोघेही अनेक कालावधीपासून एकत्र काम करीत नाहीत. परंतु काही पूर्वग्रहदूषित राग मनात ठेवून मच्छिंद्र चिंचोळे यांनी माझ्यावर हल्ला केला, महिला भगिनींना लज्जा उत्पन्न होईल असे अपमानास्पद वर्तन करून हाणमार केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता पडताळणे, घटनेची पार्श्वभूमी जाणून घेणे आणि आवश्यक पुरावे संकलित करणे या बाबी तपासात महत्त्वाच्या ठरणार आहेत. संबंधित व्यक्तींच्या जबाबांमधून तसेच उपलब्ध पुराव्यांमधून घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पोलिसांचा अधिकृत तपास आणि पुढे समोर येणारी माहिती यांना या प्रकरणात महत्त्व राहणार आहे.