नागरिकांच्या घराघरात ‘धोकादायक’ सिलिंडर पोहोचत असल्याचा आरोप; कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
व्हिएस न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील भीमशँकर कॉलनीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर अचानक निघाल्याने मोठा आवाज झाल्याची घटना सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) दुपारी घडली. या घटनेत घरातील किचनच्या भिंतीवरील टाईल्सचे नुकसान झाले असून, एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. ही घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी स्पष्ट केले की, "गॅस सिलिंडरचा स्फोट झालेला नाही, केवळ रेग्युलेटर निघाल्यामुळे मोठा आवाज झाला होता",पण नागरिकांचे म्हणणे असे आहे की, घरगुती सिलिंडरमधून २ ते ३ किलो गॅस काढून घेताना सिलिंडरच्या सील, नोजल अथवा व्हॉल्व्हशी छेडछाड होत असून, अशा प्रकारे छेडछाड झालेले सिलिंडर पुन्हा नागरिकांच्या घरात पोहोचत असल्यास संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
दापोडी परिसरातील विषारी हातभट्टीच्या कथित प्रकाराप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरातील घरगुती गॅस सिलिंडरमधून अनधिकृतरीत्या गॅस काढण्याचा प्रकारही नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरू शकतो, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘गॅस चोरी’ नव्हे, नागरिकांच्या जीविताचा प्रश्न!
घरगुती गॅस सिलिंडर हा स्वयंपाकासाठी प्रत्येक कुटुंबाच्या घरात वापरला जाणारा ज्वलनशील पदार्थ आहे. त्याच्या सुरक्षिततेशी कोणतीही छेडछाड झाली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. त्यामुळे सिलिंडरमधून गॅस काढणे, सीलशी छेडछाड करणे किंवा वितरणापूर्वी त्यामध्ये अनधिकृत बदल करणे हा केवळ वजनातील फसवणुकीचा विषय नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे.
सांगवी आणि पिंपळे सौदागर परिसरात अशा प्रकारे गॅस काढला जात असल्याचा आरोप खरा असल्यास, संबंधित सिलिंडर पुन्हा ग्राहकांच्या घरापर्यंत कसे पोहोचतात? त्यांची तपासणी कोण करतो? ग्राहकांना सिलिंडरशी छेडछाड झाल्याची माहिती दिली जाते का? हे प्रश्न प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
घराघरात ‘धोका’ पोहोचतोय का?
एखाद्या सिलिंडरशी छेडछाड झाली आणि तो सिलिंडर पुन्हा ग्राहकाच्या घरात पोहोचला, तर त्या घरातील कुटुंबाला त्याची कल्पनाही नसू शकते. त्यामुळे गॅस चोरी करणाऱ्यांपेक्षा हा सिलिंडर वापरणाऱ्या सामान्य कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ‘आज गॅस चोरी झाला, उद्या दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पोलिस आणि पुरवठा विभाग गप्प का?
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असताना पोलिस प्रशासन आणि पुरवठा विभागाने अद्याप ठोस कारवाई केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गॅस एजन्सी, वितरण केंद्र आणि संबंधित कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी करण्यात आली आहे का? सिलिंडरचे वजन आणि सील तपासण्यात आले आहेत का? मागील काही काळात ग्राहकांकडून वजन कमी असल्याच्या किंवा सिलिंडरशी छेडछाड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत का? या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.
परिसरातील घरातील चुलीवर सुरक्षित सिलिंडर आहे की छेडछाड झालेला धोकादायक सिलिंडर?
छेडछाड झाल्याने रेग्युलेटर व्यवस्थित बसत नसल्यास गॅसगळती होऊन संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकतो. आयुक्तांनी ‘दापोडी पॅटर्न’प्रमाणे सांगवीचीही चौकशी करावी विषारी दारूच्या प्रकरणात पोलिस प्रशासनाने ज्याप्रमाणे गंभीर दखल घेतली, त्याच धर्तीवर घरगुती गॅस चोरीच्या आरोपांकडेही केवळ छोट्या स्वरूपाचा गैरप्रकार म्हणून न पाहता नागरिकांच्या जीविताशी संबंधित विषय म्हणून पाहण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी सांगवी परिसरातील या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तसेच पुरवठा विभागाने संबंधित गॅस एजन्सींचे रेकॉर्ड, सिलिंडरचे वजन, सील आणि वितरण प्रक्रिया तपासावी, अशी मागणी होत आहे.
विषारी दारूचा धोका बाटलीतून घरापर्यंत पोहोचतो;
गॅस सिलिंडरचा धोका मात्र थेट स्वयंपाकघरात पोहोचतो. त्यामुळे या कथित प्रकाराची सत्यता तातडीने तपासून नागरिकांना सुरक्षित सिलिंडर मिळत आहेत की नाही, याची खात्री प्रशासनाने करणे आवश्यक आहे.
सांगवीकरांच्या घरातील चुलीवर सुरक्षित सिलिंडर आहे की छेडछाड झालेला धोकादायक सिलिंडर?
या प्रश्नाचे उत्तर आता पोलिस आणि पुरवठा विभागाच्या तपासातूनच समोर येणे आवश्यक आहे.
व्हिएस न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) मधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकीत रक्कम, विशेषतः तिसरा हप्ता, तातडीने अदा करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपा कामगार मोर्चाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवेदन सादर करण्यात आले.
भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर रवी भाऊ लांडगे तसेच स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक भाऊ बारणे यांची भेट घेऊन PMPML कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन फरकाबाबत चर्चा केली. थकीत रक्कम अदा करण्यासाठी महापालिकेने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली
. या मागणीची दखल घेत महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेबाबत आवश्यक निधी लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे सरचिटणीस भागवत नाना खेडकर, राजेंद्र सानप यांच्यासह मोर्चाचे पदाधिकारी तसेच PMPML कर्मचारी उपस्थित होते.
सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने PMPML कर्मचाऱ्यांमध्ये प्रतीक्षेचे वातावरण आहे. थकीत रक्कम मिळाल्यास कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संजय पटनी यांच्या नियुक्त्यांवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये खळबळ; सचिन काळभोर यांचा सवाल — ‘जुन्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे काय?’
व्हिएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील संघटनात्मक नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. एका व्यक्तीला शहर संघटनेतील दोन महत्त्वाची पदे देण्याची गरज नेमकी काय? असा सवाल भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर रोजी उपस्थित केला आहे.
संजय पटनी यांची काही महिन्यांपूर्वी शहर भाजपच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांची शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
आमदारांशी निकटता असल्यानेच पदांची ‘वाट’ सोपी?
संजय पटनी हे आमदार महेश लांडगे यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याने त्यांना संघटनेतील महत्त्वाची पदे तुलनेने सहजपणे मिळत असल्याचे आरोप सचिन काळभोर यांनी केला आहे.
“पक्षासाठी वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदासाठी प्रतीक्षा करावी लागते; मात्र आमदारांच्या जवळच्या व्यक्तींना संघटनेतील महत्त्वाची पदे सहज मिळतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. हे पक्षाच्या संघटनात्मक न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे का?” असा सवाल काळभोर यांनी उपस्थित केला.
मार्च २०२६ मध्ये संजय पटनी यांची शहर भाजपच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते पटनी यांना शहर जिल्हा सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
शहराध्यक्षांचा कलही आमदारांच्या गटाकडे?
दरम्यान, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या कार्यपद्धतीबाबतही काळभोर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शहराध्यक्षांचा कल आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय गटाकडे अधिक असल्याची भावना पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शहर संघटनेतील नियुक्त्यांमध्ये सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी व्यापक चर्चा होण्याऐवजी विशिष्ट नेतृत्वाच्या जवळच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना निर्माण होत असेल, तर त्याचा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर परिणाम होऊ शकतो, असे काळभोर यांनी म्हटले आहे.
‘बापू, तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का?’
“एका व्यक्तीला शहर कार्यकारिणीत दोन महत्त्वाची पदे दिली जात असतील, तर पक्षासाठी अनेक वर्षे अहोरात्र काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेकडे पाहायचे तरी कसे? आमच्यावर विश्वास नाही का?” असा थेट सवाल काळभोर यांनी केला आहे. पक्षासाठी आंदोलने, मोर्चे, नागरिकांच्या प्रश्नांवर पाठपुरावा आणि संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र नियुक्त्यांमध्ये संधी मिळत नसल्याची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार होणार की ‘जवळच्या’ कार्यकर्त्यांनाच संधी?
भाजपमध्ये अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते पक्षासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करतात. निवडणुका असोत किंवा नागरिकांचे प्रश्न, हे कार्यकर्ते सातत्याने मैदानात दिसतात. मात्र, पदांच्या नियुक्तीच्या वेळी त्यांच्याऐवजी नेतृत्वाच्या जवळच्या व्यक्तींनाच वारंवार संधी मिळत असल्याची भावना निर्माण झाली, तर ‘निष्ठेची किंमत काय?’ हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दखल घ्यावी
या संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षातील वरिष्ठांनी विचार करावा तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवरील नियुक्त्यांबाबत व्यापक चर्चा करून निर्णय प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘एकाच व्यक्तीला दोन महत्त्वाची पदे नकोत’
शहर कार्यकारिणीत एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक महत्त्वाची पदे देण्याऐवजी पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यात संघटनात्मक विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तसेच ३० सप्टेंबरच्या वृत्तानुसार पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी आणि पक्षनिष्ठेला महत्त्व देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे एका बाजूला ‘निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी’ देण्याची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला संजय पटनी यांच्या सलग दोन महत्त्वाच्या नियुक्त्या यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
"लवकरच मी एका पदाचा राजीनामा देणार आहे."
- संजय पटनी यांची प्रतिक्रिया
पीसीयू येथे ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन
व्हिएस न्युज - भविष्यातील तंत्रज्ञानाशी समन्वय साधणाऱ्या ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’सारख्या अत्याधुनिक सुविधा पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) परिसरात उपलब्ध करून देणे हा आनंदाचा क्षण आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवोन्मेष, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी या उच्च तंत्रज्ञान सुविधांचा पुरेपूर उपयोग करून आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन पीसीयूचे कुलपती व पीसीइटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले.
दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समितीचे सदस्य अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आयटी आणि आयटीईएस प्रमुख डॉ. रामकृष्ण वडाली, पीसीयू फोर्ब्स मार्शल प्रमुख राजेश पाटील, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि.चे सीईओ व संस्थापक अजित गटे, लि.आम, गजानन पाटील आदी उपस्थित होते.
पद्मश्री प्रतापराव पवार म्हणाले, “एआय, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल यांसारखी क्षेत्रे भविष्यातील उद्योगविश्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्यातील सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक होऊन रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.” भविष्यातील गरजा ओळखून पीसीयूने सुरू केलेले हे सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यार्थ्यांसह उद्योग क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
पीसीयू-टाटा मोटर्स डिप्लोमा प्रमुख डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, या केंद्राचा उपयोग पीसीयू-टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रमासाठी तसेच केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित कौशल्य विकास कार्यक्रमासाठी होणार आहे.
डॉ. रामकृष्ण वडाली यांनी सांगितले की, सी-डॅक पुणे, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि. आणि एएमडी यांच्या सहकार्याने १६ अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ विद्यार्थी, संशोधक तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना घेता येणार आहे. या सेंटरमध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इंडस्ट्रियल मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन विथ आयआयओटी, इंडस्ट्रियल व्हर्च्युअल फॅक्टरी ऑटोमेशन अँड डिजिटल ट्विन, एआय रोबोटिक्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल डिझाइन, ॲडव्हान्स्ड एम्बेडेड आयओटी व एआयओटी, इंडस्ट्रियल कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, एआय अँड ॲडॅप्टिव्ह कॉम्प्युटिंग तसेच संशोधन व विकास प्रयोगशाळेचा समावेश आहे.
या अत्याधुनिक केंद्रामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न घेता प्रत्यक्ष तंत्रज्ञानावर काम करण्याची, संशोधन करण्याची आणि उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्य विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पीसीयूच्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य विकासाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
कामगार नेते यशवंत भोसले यांना ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा
कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे कामगार नेते यशवंत भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कामगारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे योगदान देणारे यशवंत भोसले यांना विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
यशवंत भोसले यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व कामगार क्षेत्रातील त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळावे, अशी सदिच्छा ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
व्हिएस न्युज – युवा उद्योजक आणि कडवट शिवसैनिक गणेशशेठ आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गणेशशेठ आहेर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी निष्ठेने जोडलेले असून, पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिक, युवा वर्ग तसेच स्थानिक सामाजिक प्रश्नांबाबत त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या एका निष्ठावंत शिवसैनिकाला पक्षाने शहरातील महत्त्वाची जबाबदारी दिल्याने शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसैनिक, युवा कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे गणेशशेठ आहेर यांनी सांगितले.
१७ सप्टेंबरच्या स्मरणासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा; अरुण पवार यांची मागणी
व्हीएस न्युज - मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या १७ सप्टेंबरचे स्मरण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अपेक्षित स्वरूपात पुढाकार घेतला नसल्याची नाराजी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे. हुतात्म्यांना अभिवादन, इतिहास प्रदर्शन, व्याख्याने तसेच विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर उपक्रम महापालिकेने आयोजित करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
भारत सरकारने १२ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत राजपत्रात हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीचा इतिहास नमूद करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला असला, तरी हैदराबाद संस्थानातील जनता निजामाच्या राजवटीखाली होती. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि मराठवाड्यासह संबंधित भाग निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या संघर्षात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण व्हावे, यासाठी १७ सप्टेंबरचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने मराठवाड्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी महापालिकेने विशेष कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
महापालिका स्तरावर विविध राष्ट्रीय दिन, महापुरुषांच्या जयंती तसेच स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात. त्याच धर्तीवर १७ सप्टेंबरनिमित्त हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्यानमाला, इतिहास प्रदर्शन, चित्रफिती तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेता येऊ शकतात. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
“१७ सप्टेंबर हा केवळ एका प्रदेशाचा दिवस नसून, भारताच्या एकात्मतेच्या आणि स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्यायाचे स्मरण करणारा दिवस आहे. या दिवसाकडे कोणत्याही राजकीय चौकटीतून न पाहता इतिहास, हुतात्म्यांचे बलिदान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवस म्हणून त्याचे स्मरण व्हावे,” असे अरुण पवार यांनी सांगितले.
महापालिकेने पुढाकार घेतल्यास पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडावासीयांसह सर्व नागरिकांना या इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होईल. इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही पवार यांनी नमूद केले.
– अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी-चिंचवड
शास्त्रीय, सुगम व चित्रपट गीतांनी रंगली सुरेल संगीत मैफल
व्हीएस न्यूज - उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर निनाद’ या सुरेल संगीत मैफिलीला पिंपळे सौदागर परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार, दि. २० रोजी सायंकाळी उन्नतीच्या प्रांगणात रंगलेल्या या मैफिलीत शास्त्रीय, सुगम तसेच चित्रपट गीतांच्या बहारदार सादरीकरणाने वातावरण संगीतमय झाले.
गीतकार, संगीतकार व गायिका म्हणून परिचित असलेल्या भारती न्यायाधीश आणि त्यांच्या शिष्य कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समिती सदस्या तथा प्रभागातील नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी संत तुकाराम महाराजांची रचना ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ सादर केली. त्यांच्या गायनातून त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वासोबतच कलाप्रेमी व्यक्तिमत्त्वाचीही झलक रसिकांना अनुभवता आली.
मैफिलीची सुरुवात ‘आले रे गणपती आज दारी रे’ या गणेशस्तवनाने झाली. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील यमन, भूप, बिहाग, काफी आणि भीमपलास या रागांतील बंदिशी सादर करण्यात आल्या. अभिजात संगीताच्या सुरेल स्वराविष्कारानंतर सुगम आणि चित्रपट गीतांच्या सादरीकरणाने मैफिलीला उत्तरोत्तर रंगत आली.
अखेरीस भारती न्यायाधीश यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने मैफिलीचा भावपूर्ण समारोप झाला. या मैफिलीत इरा, शौर्यवी, राघवी, ध्वनी, अथर्व, आस्मी, ओजस्वी, पयोधी, सौम्या, गार्गी आणि श्रीयान या बालकलावंतांसह सुलभा माने, प्रभा बसवंते, रेखा देवपूरकर, सुचिता सिदनाळे आणि सुनीता सावळे या ज्येष्ठ महिला शिष्य कलावंतांनी विविध गीतांचे सादरीकरण केले. सर्व कलावंतांना तबल्यावर चैतन्य डांगे, तर संवादिनीवर भारती न्यायाधीश यांनी समर्पक साथसंगत केली.
मैफिलीच्या निवेदनाची धुरा भामिनी महाले यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाच्या अखेरीस उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे आणि उद्योजक धनंजय भिसे यांच्या हस्ते सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. रसिकांच्या उत्स्फूर्त दाद आणि टाळ्यांच्या कडकडाटात ‘स्वर निनाद’ मैफिलीची सांगता झाली.
वर्षे सरली, आठवणी कायम!
व्हिएस न्यूज - शाळा सुटली, वर्ग बदलले, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात रमला; मात्र शाळेच्या आठवणी आणि मैत्रीची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. याच जिव्हाळ्याचा अनुभव हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ इंग्लिश मीडियम बॅचच्या रियुनियनमध्ये आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी श्री कृष्ण पॅलेस हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या आग्रहाला मान देत शिक्षक ॲड.आशुतोष रानडे, रमेश गाढवे, अनिथा कदम (स्टीवन मिस) आणि कविता गायकवाड, मुकेश पवार आवर्जून उपस्थित राहिले. अनेक वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने वातावरण भावनिक झाले. शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि मनोगत व्यक्त केले.
‘गुरुंचे ऋण कधीही फेडता येत नाही’ या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे मार्गदर्शन याबद्दल विद्यार्थ्यांनी विद्यालयाची तसेच शिक्षकांची मनापासून प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील दिवंगत शिक्षक, कर्मचारी आणि दिवंगत माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे श्लोक म्हणत आपल्या गुरुजनांना मानवंदना दिली.
रियुनियनच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे नियोजन केले होते. संगीत, मनोरंजन आणि हास्य-विनोदाने कार्यक्रमाला रंगत आणली. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीने शालेय जीवनातील खोड्या, गमती-जमती आणि अविस्मरणीय प्रसंगांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रपरिवाराने शाळेच्या आठवणींमध्ये रमून एकमेकांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.
‘शाळा म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी, संस्कार आणि नाती आहेत,’ याची प्रचिती या रियुनियनमधून आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीन अझीझ आणि दिपाली दंदाडे यांनी केले आणि प्राजक्त घोरपडे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत अशाच प्रकारे भविष्यातही स्नेहबंध कायम ठेवण्याचा संकल्प केला.तसेच सर्वांना आकर्षक भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या अविस्मरणीय रियुनियनचे आयोजन प्राजक्त घोरपडे, विक्रांत वर्मा, अमीन अझीझ,दिपाली दंदाडे, गझलनाझ अल्फोन्स यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूलच्या २००३(इंग्रजी माध्यम) बॅचचा हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी आठवणींच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवावा असा ठरला.
व्हिएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा ऑनलाइन पगार स्लिप उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप महाराष्ट्र कामगार सेलचे महासचिव हनुमंत नामदेव लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे दिनांक ३० ऑगस्ट रोजी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे ७,५०० कायम कर्मचारी, तर अंदाजे १५ हजार कंत्राटी व मानधन कर्मचारी कार्यरत असल्याचे लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे. कायम कर्मचाऱ्यांना दरमहा ऑनलाइन पगार स्लिप दिली जाते; मात्र कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांना अशी सुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पगार स्लिप उपलब्ध नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांशी संबंधित असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सामान्य प्रशासन, कामगार कल्याण, लेखा आणि मुख्य लेखापरीक्षण विभागाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात ३० दिवसांच्या आत चौकशी करून योग्य आदेश पारित करावेत आणि त्याची माहिती लेखी किंवा ई-मेलद्वारे द्यावी, अशी मागणी लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा हा प्रश्न किमान वेतन मंडळ, कामगार कल्याण मंडळ, ईएसआयसी, ईपीएफओ, आयकर विभाग, राज्य व केंद्रीय कामगार आयुक्त, मानवाधिकार आयोग, सफाई कामगार आयोग, जिल्हाधिकारी तसेच न्यायालय आणि लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान
व्हिएस न्यूज - संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील "सा" देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी भाषेतील गाणे ‘गणराज रंगी नाचतो’ हे रेकॉर्ड झाले तेंव्हा मी १३ वर्षाची होते. आशाताईंची गाणी ऐकून मला प्रेरणा मिळते. भाऊसाहेब भोईर यांच्या निमंत्रणाचा मी स्वीकार करते आणि लवकरच पिंपरी चिंचवड शहरासाठी एक सांगीतिक कार्यक्रम करेल असे आश्वासन आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका श्रेया घोषाल यांनी "२१ वा आशा भोसले पुरस्कार" स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल यावर्षीचा हा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते शनिवारी, (दि. २९) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अमित गोरखे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उद्योजक कृष्ण कुमार गोयल, नगरसेवक गौरव घुले तसेच मानसी भोईर- घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग, गौरी लोंढे आदी उपस्थित होते.
हा पुरस्कार रु. १,११,०००/- रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आणि पैठणी मानसी भोईर-घुले यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना प्रदान करण्यात आली.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी श्रेया घोषाल यांना आशीर्वाद देताना सांगितले की,श्रेयाला मी लहानपणापासून बघतो आहे सर्वप्रथम षण्मुखानंद हॉलमध्ये माझेच गाणे गाताना मी तिला पाहिले. तेव्हाच तिला तू खूप छान गाते, असा आशीर्वाद दिला आहे. आता भाऊसाहेब भोईर आमदार व्हावेत अशी इच्छा आहे.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, भाऊसाहेब भोईर हे या शहराचे सांस्कृतिक मंत्री आहेत. भोईर जर यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर, आज ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री झाले असते. अजूनही वेळ गेली नाही, असे म्हणतात प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करून आ. गोरखे यांना प्रतिसाद दिला.
स्वागत, प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, तर उच्छवास आशादीदी आणि याचे हृदय म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत.
लता मंगेशकर यांना देश सन्मानाने दीदी म्हणतो तसेच आता श्रेया घोषाल या आमच्या "छोटी दीदी" आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम करण्यासाठी वेळ द्यावा असा आग्रह केला. याला श्रेया घोषाल यांनी देखील हात उंचावून होकार दर्शविला.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचा सन्मान आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम झाला. यावेळी श्रेया घोषाल यांच्या हस्ते मानसी भोईर-घुले यांच्या "मानसी रेस्कोर" या बँडचे अनावरण करण्यात आले. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफलीचा रसिकांनी आनंद लुटला. यावेळी मानसी भोईर-घुले यांनी देखील गाणी गायली.
तसेच या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेची माहिती देणारी चित्रफीत सादर करण्यात आली. यामध्ये सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
व्हिएस न्यूज - पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लागू असलेली 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप पदाधिकारी जयेश चौधरी यांनी केली आहे.
पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना शहरात पाणी कपात सुरू ठेवण्याची आवश्यकता काय, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणी कपात रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या संदर्भात निवेदन देऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अधिकारी विविध कारणे सांगून सदर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, कार्यालयीन कामासाठी जाणारे नागरिक तसेच स्वयंपाकासाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना सकाळच्या वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीचा विचार करून सकाळच्या वेळेत पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे.
पिंपरी कॅम्प परिसरात सध्या दुपारी 12.30 ते 1.00 या वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याने महिला, नोकरदार वर्ग आणि इतर नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठ्याची वेळ बदलून सकाळच्या वेळेत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होईल अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे योग्य नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे आवश्यक आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, अशी भूमिका चौधरी यांनी व्यक्त केली.
“पवना धरण 100 टक्के भरले असताना पाणी कपात कशासाठी? नागरिकांना नियमित, सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी मिळाले पाहिजे. निवेदन देऊन अनेक दिवस झाले, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ कारणे सांगितली जात आहेत. आता कोणतीही सबब न सांगता 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि पाणीपुरवठ्याची वेळ सकाळची करावी,” अशी मागणी जयेश चौधरी यांनी केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002