व्हीएस न्यूज - काळेवाडी सिग्नल जवळ मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक महिला ही तरुणाला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत असल्याचे स्माईल प्लस संस्थेचे योगेश मालखरे यांनी पाहिले. त्यांनी संशय येताच तरुणाकडे धाव घेतली असता संबंधित महिला पळून गेली. पिडीत तरुणाने त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, अनुप सिंग (वय अंदाजे 30, रा. जॉनपूर,उत्तरप्रदेश) या पीडित तरुणाला दुणुकाबाई युवराज काळे (वय 70, रा. अहमदनगर) हिने केवळ हजार रुपयांना विकत घेतले होते. त्याला दिवसाला दीड हजार रुपयांचे टार्गेट देखील या बाईंनी दिले होते. ते पूर्ण झाले नाही तर त्याला रात्री उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे असे अत्याचार केले जात. दुणुकाबाई ही अनुपला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत होती. यावेळी मालखरे यांनी अनुपला विचारणा केली असता दुणुकाबाई हिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अनुपही मला वाचवा असे ओरडू लागला. तिला पकडून विचारणा केली असता तिने अनुपला चक्क एक हजार रुपये देऊन भाड्याने आणल्याचे सांगितले. त्यानंतर मालखरे यांनी दोघांना वाकड पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी अनुपचा जबाब नोंदवून महिलेवर मुंबई भिक्षा प्रतिबंधक नियम कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची म्हणजे दुणुकाबाई हिचा पेहराव व अवतार भिक्षुक महिलेचा होता. मात्र तिची झडती घेतली असता हजारो रुपये आणि चक्क व्होल्वो बसच्या स्लीपर कोचचे तिकीट मिळाले. इतकेच नाही तर तिने पोलिसांना एका वकिलाचे व्हिजिटिंग कार्ड देत हा आमचा वैयक्तिक वकील असून याला फोन करा असे सांगितले. या प्रकारामुळे भीक मागणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून मोकळ्या मैदानात उभा केलेला ट्रक जाळण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडीतील पॉवर हाऊस येथे घडली. याप्रकरणी रामनारायण ज्ञानोबा पारखी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंजीर (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी माहिती दिली. पारखी आणि कुंजीर यांची यापूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आहे. पारखी यांचा ट्रक हिंजवडी येथील पॉवर हाऊस शेजारील वीटभट्टी जवळील मोकळ्या जागेत गेल्या सहा महिन्यापासून उभा आहे. कुंजीर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरूवारी सकाळी पहाटे पाच वाजता पारखी याचा ट्रक पेटवून दिला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - शहरातील, टपरी पथारी हातगाडी धारकाच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या समस्या सोडवण्यासाठी, फेरीवाल्यांची संख्या, हॉकर्स झोन दिलेले लायसन्स आणि किती फेरीवाल्यांचा सर्वे झाला, किती राहिले याबाबत माहिती करून घेण्यासाठी टपरी पथारी हातगाडी पंचायत वतीने जनजागृती अभियान राबविले जात आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे फळभाजी विक्री करणाऱ्या कष्टकरी महिला शारदा जगताप, सुनंदा बेडें यांचे फॉर्म भरून अभियानास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे उपाध्यक्ष गणेश अहेर, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, राजेश मायरमनी, रवी शेलार, राम प्लहारे, संतोष परदेशी युवराज माळी आदी उपस्थित होते. टपरी पथारी हातगाडी 2007 साली कायदा झाला. 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 10 वर्षानंतर देखील आज शहरात एकही अधिकृत हॉकर्स झोन झाले नाही. टपरी हातगाडी पथारी धारक फळभाजी विक्रते अशा गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ झाला नाही. गोरगरिबांच्या योजनेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून श्रीमंत व्यक्ती ने लाभ घेतला आहे. या योजनेत अनेक व्यक्ती ना लायसन्स मिळाले मात्र त्याचे पक्या गळ्यामध्ये पुनवर्सन झाले पाहिजे. प्रत्येक विभागात हॉकर्स झोन झाले पाहिजे. या साठी हे अभियान राबवले असल्याने बाबा कांबळे यांनी सांगितले. या अभियान अंतर्गत शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकाचा मोफ़त सर्वे करून 15 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना हा सर्वे सादर करणार असल्याने प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले. शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांनी अभियानात सहभागी होऊन मोफत असलेले फोर्म भरून दयावेत असे आव्हान शहराध्यक्ष रमेश शिंदे यांनी केले.
व्हीएस न्यूज - मोशी येथील यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छता ऍप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकते,मुख्याध्यापिका शोभा देवकते आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयात 16 जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर प्रणाली, आजची युवक संस्कृती, सरकारची वाटचाल या तिन विषयावर स्पर्धा होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली.
व्हीएस न्यूज - राहत्या घरासमोर पार्क केलेली मारूती कंपनीची ईरटिगा मोटार 12 डिसेंबर रोजी चोरीला गेली आहे. या मोटारीचा चिंचवड पोलीसांना अद्याप छडा लावण्यात यश आले नाही. याप्रकरणी उदयसिंह तात्यासाहेब गायकवाड (वय-55, रा. गिरीराज हौसिंग कॉम्प्लेक्स, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची एमएच-14. एफ. जी.2659 या क्रमाकाची ईरटीगा मोटार त्यांच्या इमारतीच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री मोटारीचे लॉक तोडून चोरून नेला. या घटनेला एक महिना झाला असून मोटारी चोरीचा चिंचवड पोलीसांना छडा लावण्यात यश आले नाही. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - कामगारांच्या पगाराच्या तीन लाख रूपये रखमेचा अपहार करणाऱ्या बाप-लेकाला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान,आरोपींना मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 15जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्जुन अंकुश गवारी (वय-43) व अंकित अर्जुन गवारी (वय-22,दोघेही रा. मेंगडेवाडी, आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या बाप लेकाची नावे आहेत. याप्रकरणी हबीब शेख (वय-53, रा. त्रिवेणीनगर, तऴवडे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांची ग्लोबल एंटरप्रायजेस नावाने मनुष्यबळ पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. शेख यांच्याकडे सुपरवायझर म्हणून अर्जुन गवारी नीइल ऑटो प्रा. लि.मी कंपनीत काम करतात. या कंपनीतील कामगारांना पगार, उचल व रूम डिपॉझिट देण्याची जबाबदारी गवारी यांच्याकडे होती. नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत आरोपी अर्जुन गवारी यांनी कामगारांचा पगार, उचल, रूम डिपॉझिट असे तीन लाख रूपये न भरता मुलगा अंकीत गवारी यांच्या मदतीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. फौजदार हरिदास बोचरे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पीएमपीएमएल बसची वाट पाहत थांबलेल्या तरूणाला अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता मुंबई-बेंगलोर हायवेवर म्हाळुंगे- बालेवाडी येथे घडली. गणेश पंडीत कांरडे (वय-22, रा. कामदनी अपार्टमेंट, बालेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन कांबळे (वय-28, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बुधवारी सकाळी मुंबई-बेंगलोर हायवेवर म्हाळुंगे येथील पीएमपीएमएल बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबला होता. भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने गणेशला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो चालकाने घटनास्थळी न थांबता पसार झाला. पोलीस निरीक्षक धुमाळ अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - दहशत निर्माण करणारा व पिंपरी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अमर नानासाहेब चव्हाण (वय-20, रा. इंदिरानगर, चिंचवड) याच्यावर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एमपीडीए अंतर्गत गुरूवारी कारवाई केली. सराईत गुन्हेगार चव्हाण हा पिंपरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवित होता. चव्हाणवर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याची शिफारस पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली होती. त्यानुसार शुक्ला यांनी सराईत गुन्हेगार चव्हाणवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. चव्हाण एका गुन्ह्याप्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील सराईत गुन्हेगारावर गोळीबार करणाया दहा आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विकी शंकलिंग सुतार (वय23),बाबुराव सोमलिंग पाटील (वय 20), प्रतिक सुरेश वाघेरे (वय 21),बबलु महाविर पाल (वय 31), रितेश उर्फ छोटू दिनेश लिंगावत (वय21), सचिन दत्तु नढे (वय 23), अविनाश दत्तु नढे (वय 28), विजय अरूण नढे (वय 27) राहुल कैलास विश्वकर्मा (वय21) अशी मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात एका वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले होते. 15सप्टेंबर 2015 रोजी संतोष अशोक कुरवत (वय 32, रा. काळेवाडी) या सराईत गुन्हेगारावर महापालिका निवडणुकीतील भांडणातून आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार केला. या हल्ल्यात चार गोळ्य़ा झाडल्याने कुरवत गंभीर जखमी झाला. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास शुक्ला यांनी बुधवारी मंजुरी दिली, अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एका दिवसात कमीतकमी वेळेत बहुतांश कॉपीराईटची नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी अभियांत्रिकीचे विद्यार्थी व शिक्षक आपले संशोधन प्रकल्प अहवाल कॉपीराईटसाठी ऑन लाईन पध्दतीने नोंदणी करणार आहेत. अशा पध्दतीचे रेकॉर्ड आतापर्यंत झालेले नाही. अशी माहिती पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी माहिती दिली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव प्रमोद भडकवडे, सहाय्यक संचालक तंत्रशिक्षण विभाग पुणेचे आर.पी. गायकवाड, जीपीपीचे संगणक विभाग प्रमुख यु.वी.कोकाटे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रा. हरिष तिवारी व डॉ. अर्चना चौगुले मार्गदर्शन करणार आहेत. पीसीसीओईआरने नावाप्रमाणेच संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेत मागील वर्षापासून पंच्चाहत्तर पेटंट आणि पंधरा कॉपीराईट नोंदविले आहेत.
व्हीएस न्यूज - पोलिसांच्या गणवेषाची आणि जबाबदारीची जाणिव वेळोवेळी वरिष्ठांनी करुन दिली. त्यामुळे नेहमी सामाजिक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून निर्णय घेतले. अशी भावना निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक बागवान यांनी व्यक्त केली.
आकुर्डीतील बीना एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 2017 चा कौमी एकता (राष्ट्रीय एकात्मता) पुरस्कार मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक इब्राहीम बागवान यांना कर्नल इर्षाद अहमद खान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इकबाल खान, सचिव रफीक आतार, मुख्याध्यापिका समीना मोमीन, खजिनदार हमजा खान, सरचिटणीस आझम खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अकमल खान, अब्दुलाह खान, ॲड. कुंडलीक गावडे आदी उपस्थित होते. बागवान म्हणाले की, बारामतीमध्ये शेतकरी कुंटूंबात माझा जन्म झाला. वडीलाच्या कडक शिस्तीमुळे लहानपणापासूनच व्यायामाची सवय लागली. शालेय जीवनात पोलिसांचा गणवेष आणि त्यांचा रुबाब मला आकर्षित करीत होता. त्यामुळे मी शालेय व महाविद्यालयीन काळात एनसीसीमध्ये सहभाग घेतला. पोलिस खात्यात भरती झाल्यानंतर मधूकर झेंडेंसारख्या वरिष्ठांकडून खूप शिकायला मिळले व सामाजिक जबाबदारीची जाणिव झाली. त्यातूनच समाजाला वेठीस धरणा-या मन्या सुर्वे या गुंडाचा एन्काऊंटर केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सापळा लावून 26/11 च्या हल्ल्यात साडेतीनशे निरपराध नागरिकांचे प्राण वाचवू शकलो. माझे वरिष्ठ अधिकारी मधूकर झेंडे आणि डॉ. वेंकटेश या कडक शिस्तीच्या अधिका-यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझा निवृत्तीनंतर तिसरे राष्ट्रपती पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. असेही बागवान यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल इर्षाद अहमद खान मार्गदर्शन करताना म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावण्यासाठी बीना इंग्लिश मिडीअम स्कूल सारख्या संस्था काम करतात. यातूनच सर्व जाती धर्मांचा आदर करणारी सुसंस्कृत पिढी घडेल असा मला विश्वास आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी जीएसटी, नोटाबंदी,महागाई, बालमजूरी, 26/11 हल्ला, महिला व लहान मुलांची तस्करी आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयावर नाटीका सादर केल्या. स्वागत इकबाल खान, सूत्रसंचालन रफीक आतार आणि आभार समिना मोमीन यांनी मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002