व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले. या उपक्रमामुळे निगडी पोलीस ठाण्यात काम करणा-या महिला पोलीस कर्मचारी, बंदोबस्तासाठी येणा-या महिला कर्मचारी तसेच तक्रारी व अन्य कामानिमित्त येणा-या सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे.
महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्ष साधना काळभोर, प्रणिता अलुरकर, शकुंतला बन्सल, सभासद सुजाता ढमाले, डॉ. रंजना कदम, माधुरी भुरकुले, नियोजित अध्यक्ष प्रतिभा दलाल, राजश्री , रो. विजय काळभोर, रो. रवी राजापूरकर, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन मधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहे. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. यामुळे सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर,कचराकुंड्यांमध्ये उघड्यावर टाकल्याने उद्भवणा-या विविध त्रासांपासून सुटका मिळणार आहे. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते. या उपक्रमामुळे महिला पोलीस कर्मचारी व उपस्थित महिलांच्या चेह-यावर भावनिक आनंद ओसंडून वाहत होता.
याबाबत बोलताना इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड च्या अध्यक्षा सविता राजापूरकर म्हणाल्या की, “महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणे ही काळाची गरज आहे. शहर शांत राहण्यासाठी पोलीस कर्मचा-यांना सतत कर्तव्यावर रहावे लागते. महिला पोलीस कर्मचारी देखील यामध्ये मागे नाहीत. मात्र सॅनिटरी नॅपकिन सारख्या काही गोष्टींमुळे त्यांची वाताहत होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा महिला पोलीस कर्मचारी व अन्य महिला लाभ घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले म्हणाले की, “अशा प्रकारचा उपक्रम परिसरात प्रथमच सुरु करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनची सर्वत्र उपलब्धता ही काळाची गरज आहे. ही गरज सर्वांनी ओळखून अशा स्तुत्य उपक्रमांना चालना द्यायला हवी. पोलीस ठाण्यात सतत महिलांचा वावर असतो. हा उपक्रम पोलीस ठाण्यात सुरु केल्याने गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.”
व्हीएस न्यूज - थेरगाव, गणेशनगर भागातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज गणेशनगर ते डांगे चौक या दरम्यान ‘हंडा’ मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चात शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे, अॅड. सचिन भोसले, ह्युमन राईट्सचे पदाधिकारी डॉ. सतिश नगरकर, रामराव नवघन, मदन जोशी, अॅड. वर्षा भोसले, दिपाली गुजर, साधना आठवले,रेखा ठांणाबीर, मिना शेळके, लक्ष्मी मंडलिक, अनिता भालेराव, कमल जाधव यांच्यासोबत मंगलनगर, गणेशनगर, शिव कॉलनी, लोकमान्य कॉलनी परिसरातील रहिवाशी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिका-यांना निवेदन देण्यात आले.
थेरगाव, गणेशनगर भागातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. अपुर पाणीपुरवठा होत असून पुरेसे वेळ देखील पाणी येत नाही. उन्हाळा सुरु होण्यापुर्वी ही परस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय परस्थिती निर्माण होईल. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महिला संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेने वेळेत आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक निलेश बारणे आणि अॅड. सचिन भोसले यांनी केली.
व्हीएस न्यूज - दिघी येथील डब्ल्यू टी प्रोजेक्ट प्रा.लिमिटेड मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीतील प्राजक्ता पाटील यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने गौरव करण्यात आला. देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिघीतील डब्ल्यू टी प्रोजेक्ट प्रा.लिमिटेड मध्ये देखील महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून महिला दिनाची तयारी सुरु होती. महिलांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते. कामाला आल्यावर सकाळी महिलांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. सायंकाळी कापण्यात आला.
गुणवंत महिला कामगार म्हणून प्राजक्ता पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दर्शना देशपांडे, अमृता पिसे, प्रियंका आवटे, स्वाती ढोले, प्राजक्ता पाटील, मनिषा गायकवाड, प्रणाली भोसले,मनाली पवार, श्यामल चव्हाण, अनघा घुले, स्वाती ढोले, अलका पारते, किर्ती मावकर आदी महिला उपस्थित होत्या.
व्हिएस न्यूज - तलवारीने केक कापून मित्राचा वाढदिवस साजरा करणाया बारा जणांवर निगडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी सहा जणांना गजाआड करण्यात आले आहे. ही घटना निगडी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. शुभम अमर मारिया (वय 18, रा. खराळवाडी, पिंपरी) सागर शिवा शिंदे (वय18) साहिल रमजान शेख (वय18, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) संदीप मारूती लोहेकर (वय20, रा. पिंपरी) सुमीत शिवाजी कांबळे (वय 19) रामचंद्र सुनील नाफडे (वय19, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत. याशिवाय सहा अल्पवयीन मुलांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास निगडी प्राधिकरणातील संत कबीरदास गार्डनमध्ये काही जण तलवारीने केक कापत असल्याची माहिती निगडी पोलीसांना मिहाली. त्यानुसार, निगडी पोलीसांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तलवारीच्या आकाराएवढे दोन कोयते आणि चार वाहने असा 2 लाख 40 हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला. सहायक फौजदार तात्या तापकीर तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने तरूणासह रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजविली. वाहनांची तोडफोड करत एकाला बेदम मारहाण केली. ही घटना दिघीतील भारत मातानगर येथे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सोमेश्वर सोळंके असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्यात आणि पोटात मारहाण करण्यात आली. सुरज जयस्वाल (वय 24, रा. वडमुखवाडी, चहोली) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयस्वाल यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, याचा राग टोळक्याला आला. सहा जणांच्या या टोळक्याने भारत मातानगर येथे येऊन जयस्वाल याला शिवीगाळ केली. रस्तयाने ये-जा करणाऱ्यांनाही शिवीगाळ करत दहशत माजवली. तसेच सोळंके यांनाही बेदम मारहाण केली. फौजदार फारूक सोलापूरे तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - ओळख असलेल्या एकाने दुचाकी नेली. दुचाकीच्या चावीबरोबर असणाऱ्या घराच्या चावीची बनावट चावी बनवून घरातील अडीच लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली आहे. श्रीमंत शिवाजी गंभीरे, (वय 40, रा. श्रीकृष्ण कालनी, मांजरी), आकाश उत्तम गिरी (वय-26 वर्षे, रा-मलंग गल्ली, सराफा लाईन, लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश पुरी हा फरार आहे. याप्रकरणी नंदकुमार अरूण बनसुडे (रा. डागा रूग्णालयाजवळ, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांनी माहिती दिली. फिर्यादी यांची श्रीमंत गंभीरे याच्याशी ओळख होती. आरोपी गंभीरे याने कामानिमित्त फिर्यादीची दुचाकी घेवून गेला होता. दुचाकीच्या चावीबरोबर फिर्यादी यांच्या घराचीही चावी होती. या चावीची बनावट चावी तयार करून आरोपी गंभीरे याने 27 फेब्रुवारी रोजी फिर्यादीचे घर उघडले. बेडरूममधील कपाटातील 2 लाख 55 हजार रूपयांचे सोन्याचे साडेआठ तोळे दागिने चोरून नेले. हे दागिने आरोपीने त्याचा मित्र आकाश गिरी याच्याकडे ठेवले होते. गंभीरे व गिरी या दोघांना सांगवी पोलीसांनी अटक केली असून त्याचा साथीदार गणेश पुरी हा फरार आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज -पिंपरी पोलीसांनी केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले. याप्रकरणी तीन अल्पवयीनांसह पाच जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन असा पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. किरण उर्फ दाद्या गौतम शिंदे (वय-21, रा. साई मंदिराजवळ, गांधीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. चोरीच्या वस्तू विकत घेणारा चाचा ऊर्फ शहजाद गफार खान (वय-46, रा. तळेगाव दाभाडे) यालाही पोलीसांनी अटक केली आहे. आरोपी किरण शिंदे याच्याकडून एक लाख, 90 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चंदननगर, वाकड, सांगवी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दोन अल्पवयीन मुले वडगाव, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव या भागात घरातील एलईडी टीव्ही, मोबाईल फोन अशा वस्तूंची चोरी करीत होते. चोरी केलेले साहित्य ते तळेगाव येथील चाचा उर्फ शहजाद गफार खान याला विकत होते. पोलिसांनी खानकडून सात दुचाकी व तीन एलईडी टीव्ही असा एकूण दोन लाख, 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघांवर पिंपरी तीन, भोसरी एमआयडीसी दोन, दौंड आणि पंढरपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे दाखल आहेत. तसेच आणखी एका अल्पवयीन मुलाकडून 40 हजार रूपये किंमतीची होंडा ऍक्टीव्हा दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तीन अल्पवयीनांसह पाच जणांकडून 13 दुचाकी, तीन एलईडी टीव्ही आणि दोन मोबाईल फोन असा पाच लाख, 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे आदींनी केली. फोटो- पोलीस नावाने
व्हिएस न्यूज - शहरातील 2015 अखेरच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर 2015 अखेरील झोपडपट्यांना संरक्षण द्यावे, झोपडपट्यांचे सर्वेक्षण करावे, झोपडी धारकांना स्मार्टकार्ड, फोटो पास द्यावे, 6500 नागरिकांना घरकुलच्या दुसऱ्या टप्पा लवकरात-लवकर सुरू करावा, अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी जाचक अटी रद्द कराव्यात, बांधकाम कामगारांचे सर्वेक्षण करून ओळखपत्र द्यावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 15 मार्च रोजी महापालिकेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष बबन साके यांनी दिली.
व्हिएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रायलय, भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्य, गायन, वादन स्पर्धांचे 30 व 31 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी नंदकिशोर कल्चरल सोसायटी, सेक्टर 21, यमुनानगर, निगडी येथे किंवा 9371099911 या क्रमांकावर संपर्क साधून करावे. नृत्य स्पर्धेत शास्त्रीय नृत्य, फिल्मीनृत्य, वेस्टर्न नृत्य, गायनात शास्त्रीय व सुगम संगीत तर वादनात तबला, हार्मोनियम, सतार अशा विविध गटात स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रायलय, भारत सरकारतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नंदकिशोर कपोते यांनी दिली.
व्हिएस न्यूज - भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच्या सुमारास चिंचवड, देना बॅंकेजवळ घडली. नितीन भिकोबा ओझरकर (वय-31, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांचा पुतण्या राहुल ओझरकर (वय-29) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक चालक नारायण रामभाऊ डोईफोडे (वय-25, रा. ईटगाव, पिंपळनेर, बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून मोशीकडून चिंचवड स्टेशनकडे जात होते. देना बॅंकेजवळ त्यांच्या मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. नितीन यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. फौजदार बोचरे अधिक तपास करत आहेत.
व्हिएस न्यूज - टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यावतीने आयोजित केलेल्या 10 व्या राष्ट्रीय स्तरावरील सेमीनारमध्ये पिंपरी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडीच्या निदेशक तानाजी कोकणे, सुनिल पाटील यांनी यश संपादन केले.
21 ते 22 फेब्रुवारी रोजी कर्नाटक येथील हलीयाल येथे झालेल्या या राष्ट्रीय सेमीनारमध्ये निदेशक तानाजी कोकणे,सुनिल पाटील, गटनिदेशक विजय आगम यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोकणे यांनी तयार केलेल्या श्रिरपशींरीू सशरी र्ीपळीं च्या ीर्ळाीश्ररींेी ला राष्ट्रीय स्तरावर बेस्ट कीझन म्हणून निवडण्यात आले. ऑटोमोटीव्ह जनरल रिपेअर या कॅटेगरीमध्ये राष्ट्रीय दिनेशक स्कील कॉन्टेस्टमध्ये सुनिल पाटील यांचा तिसरा क्रमांक आला असून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टी- टेप प्रशिक्षण राबविले जात असून या संस्थेला 10 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
व्हिएस न्यूज - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील लिफ्टच्या डक्टमधून खाली पडल्याने मजुराचा मृत्यु झाल्याप्रकरणी वाकड पोलीसांनी ठेकेदारासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
ठेकेदार रणवीर सिंग याच्यासह इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीपकुमार श्रीचंदर प्रजापती (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. संदीपकुमार प्रजापती (वय 19, रा. रामपूर ठाणा, जि. बस्ती,उत्तरप्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीपकुमार हे कोलते पाटील डेव्हलपर्स यांच्या वाकड येथील ऍव्हेन्यू बांधकाम साईटवर मजुर म्हणून काम करत होते. 28फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. प्रदीपकुमार फरशी घेण्यासाठी लिफ्टच्या डक्टजवळ गेले असता पाय घसरून खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. कामगाराच्या जिविताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही साधने न पुरविता मजुराच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी रणवीर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार एस. एस. घोळवे तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002