व्हीएस न्यूज - विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विधानसभेत तरी परिस्थिती सुधारणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. खासकरून चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणाला उतरवणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा खरं तर आमदार लक्ष्मण जगताप यांचा, पर्यायाने आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडे तेवढा सक्षम उमेदवार नाही, ही वस्तुस्तिथी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे चिंचवडच्या उमेदवारीचे मोठे आव्हान असणार आहे. जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जी नावे पुढे येतात त्यात नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. पण नाना काटे यांचे पिंपळे सौदागर आणि परिसर वगळता इतर भागात म्हणावे तसे वजन दिसून येत नाही. किंबहुना संपूर्ण मतदार संघाचा चेहरा म्हणून ते ओळखले जात नाहीत. राष्ट्रवादीकडून चिंचवडसाठी येणारे दुसरे नाव म्हणजे भाऊसाहेब भोईर यांचे आहे. शहरातील ज्येष्ठ नेते म्हणून ते नक्कीच परिचित आहेत. परंतू महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना किती यश येऊ शकते हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे.
राष्ट्रवादीकडून इतर येणारी नावे जगताप यांच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहेत. जगताप यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची क्षमता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यात नाही हे उघड सत्य आहे. परंतू लक्ष्मण जगताप यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मात्र भाजपाकडेही जगताप यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे. चिंचवडमध्ये जगताप हे स्वतः विधानसभेचे उमेदवार असले तरच भाजपासाठी चिंचवडचा मार्ग सुकर ठरणार आहे. पण जगताप उमेदवार नसतील तर भाजपाला ही उमेदवारीचा प्रश्न पडू शकतो. पण किमान त्या उमेदवाराला जगताप यांचा पाठिंबा मिळणार असल्याने त्याचे पारडे थोडे जडच असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी चिंचवड विधानसभा उमेदवारी आणि निवडणूक दोन्ही ही सोपी नसल्याने डोकेदुखी वाढणार आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांच्या समस्यांबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये महिनाभरात बैठक आयोजित केली जाईल, अशी घोषणा खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
शहरातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार बारणे यांनी उद्योजकांच्या विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी बारणे यांनी वरील घोषणा केली. या बैठकीत पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर, उद्योजक प्रमोद राणे, सुरेश म्हेत्रे, रंगनाथ गोडगे पाटील, जयंत कड यांनी सरकारकडून उद्योजकांना असलेल्या अपेक्षा मांडल्या. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया या योजना, जीएसटी करप्रणाली, शासनाची उद्योग व कामगारविषयक धोरणे यावपर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
खासदार बारणे म्हणाले की, शहराच्या विकासात उद्योगांचा सर्वांत मोठा वाटा आहे. त्यामुळे समन्वयातून उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्य शासन व केंद्र शासनाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना महिनाभरात शहरात बोलवून त्यांच्याबरोबर उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात येईल. आवश्यकता असल्यास मुख्यमंत्र्यांबरोबरही उद्योजकांची बैठक आयोजित केली जाईल. जीएसटी अंमलबजावणीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर शहरातील उद्योजकांची बैठक घडवून आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.
उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर आपण यापूर्वीत संसदेतही आवाज उठवला आहे, असे सांगून बारणे म्हणाले की, शासन, प्रशासन व उद्योजक यांच्या समन्वयातून आपल्याला मतदारसंघाचा विकास घडवायचा आहे. उद्योगांचे प्रश्न केंद्र सारकारच्या विविध मंत्रालयांशी संबंधित आहे. त्या मंत्रालयांकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. नवी मुंबई येथील नियोजित विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहचता येईल, अशा रस्त्याचे नियोजन सुरू असल्याने उद्योजकांनी काळजी करू नये, असा दिलासा ही बारणे यांनी दिला. राष्ट्रीयीकृत बँकांकडून वित्तपुरवठ्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक तो समन्वय साधून देण्यात येईल. उद्योजकांच्या प्रश्नांसदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्याची सूचनाही बारणे यांनी केली. औद्योगिक प्रगती करत असतानाच उद्योजकांनी रोजगारनिर्मिती करून शहराच्या व देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहनही बारणे यांनी यावेळी केले.
संदीप बेलसरे म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजकांना सर्वाधिक कर भरावा लागतो. महाराष्ट्रात विजेचे दर प्रचंड आहेत. शासकीय धोरणे, अनास्था आणि भ्रष्टाचार यामुळे उद्योग चालविणे कठीण होऊन बसले आहे. एमआयडीसीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प होण्यास उद्योग संघटनेचा विरोध आहे. प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी वसुलीचे प्रकार,चोऱ्या यांना पायबंद बसला पाहिजे. रेडझोनचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र पिंपरी-चिंचवड होण्यासाठी प्रयत्न करावेत आदी सूचनाही त्यांनी केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडसाठी लवकरात लवकर स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी अपेक्षा प्रमोद राणे यांनी व्यक्त केली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी शासनाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करून त्यांची विद्यार्थी क्षमता वाढवावी. पुण्यात आयआयटी, आयआयएम सारख्या शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात, अशी सूचना योगेश बाबर यांनी केली. आजारी असलेल्या लघु-मध्यम उद्योगांच्या पुनर्वसनासाठी बीआयएफआर सारखे मंडळ स्थापन करण्यात यावे. ईएसआय हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीवर उद्योजकांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणी रंगनाथ गोडगे पाटील यांनी केली. उद्योगांकडून मिळणाऱ्या महसूलाच्या प्रमाणात केंद्राने देखील उद्योगांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुरेश म्हेत्रे यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उद्योजक प्रवीण भालेसेन यांनी केले.
व्हीएस न्यूज - भोसरी पोलिस ठाण्याच्या प्रभारी प्रमुखपदी (वरिष्ठ निरीक्षक) संपतराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरीचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी भोसरी पोलिस ठाण्यात नियुक्त असणा-या सहाय्यक निरीक्षकास व शिपाईला ५० हजारांची लाच घेताना अटक करण्यात होती. तसेच मागील अनेक महिन्यांपासून भोसरीच्या तपास पथकाकडून कोणताही मोठा गुन्हा उघडकीस आणलेला नाही. तसेच चो-या रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे भोसले यांना भोसरीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त केल्याचे समजते. तर कुलकर्णी यांनी वैद्यकीय कारणामुळे स्वत:हून बदली मागून घेतल्याचे सांगितले जात आहे.
व्हीएस न्यूज - आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
आशिष दीपक पावसकर (वय, २१ शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव असून तो सिम्बायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगला शिकत होता. तर त्याचे वडील मुंबईला राहतात. आई शिक्षिका असून आई व मुलगा दोघेही आकुर्डीत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याच्या मित्रासोबत (एम एच १४ एआय ८७४८) या अॅक्टिव्हा गाडीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात होता. यावेळी त्याला नवीन चासी असणाऱ्या डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डाव्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मरण पावला तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. जखमी मित्र व आशिषला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असून डंपर चालकाला निगडी पोलिसांच्या ताब्यात आहे.
व्हीएस न्यूज - गुरुपौर्णिमेनिमित्त पायल नृत्यालयाच्या वतीने ‘’अभिव्यक्ती’’ हा कथक नृत्याचा कार्यक्रम शनिवार ४ नोव्हेंबर रोजी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी १२ ते ३ या वेळेत होणार आहे. जगप्रसिद्ध नृत्यांगना पंडीता मनिषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या पायल गोखले आणि त्यांच्या विद्यार्थिनी कार्यक्रम सादर करतील.
या कार्यक्रमाला गुरु पंडिता मनिषा साठे, गुरु पं. नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत निगुडकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमात वैविध्यपूर्ण कथकाविष्कारांचा आनंद उपस्थितांना घेता येईल. कथक नृत्याविष्काराने परिपूर्ण अशा या कार्यक्रमात कथकचे विविध रंग पाहायला मिळतील. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने होणार असून सरस्वतीवंदना, झपताल, खंडिता गुरु पायल गोखले सादर करतील. तर, अभंग, तराणा, तालप्रस्तुती, होरी, शिवस्तुती, ठुमरी, सतारवर कथकनृत्य हे प्रकार विद्यार्थीनी सादर करतील. गेली १० ते ११ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या पायल नृत्यालयाने आजवर कथकच्या विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांनी दिली आहे. अभिव्यक्तीतूनही सुरेख कथकचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पायल नृत्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला आहे. सदर जागा मेट्रोला सुपूर्द करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे 2.67 हेक्टरची जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळेल, असे महामेट्रोच्या वतीने कळविण्यात आले आहे.
याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गिकां दरम्यान शिवाजीनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो लाईन देखील एकत्र येणार आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणेकरांसाठी महत्त्वाचे असेल. याच बरोबरच या जागेचा आगाऊ ताबा मिळाल्याने प्रकल्पाला आणखी वेग येणार आहे. ही जागा मेट्रोला आगाऊ ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नाबद्ल शासनाचे महामेट्रोच्या वतीने आभार मानले आहेत.
व्हीएस न्यूज - औंध येथील जिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. या समस्यांचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. 30) रुग्णालयाला भेट दिली. या वेळी रुग्णालयाच्या कामकाजावर नाराजी दर्शवत काम सुधारण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांना त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार जगताप यांनी रुग्णालयाच्या ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग), केसपेपर विभाग, महिला विभाग, डोळ्यांचा विभाग, लॅब व लहान मुलांच्या लसीकरण विभागाला भेट दिली. प्रत्येक विभागाच्या अडचणी विचारून घेतल्या. या अडचणी त्वरित सोडविण्याची सूचना डॉ. आर. के. शेळके यांना दिली. जिल्हा रुग्णालयात प्रतीक्षालय लाखो रुपये खर्च करून बांधले आहे. तरी अद्याप ते बंद अवस्थेतच आहे. सार्वजनिक बाधकाम विभागाकडून काही काम अपूर्ण असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले; तसेच त्यांनी महिला प्रतीक्षालयाला भेट दिली. सदर प्रतीक्षालय गेले वर्षभर बंद असल्याचे दिसून आले. या वेळी सदर प्रतीक्षालयात लिफ्टचे सामान असल्याचे डॉ. आर. के शेळके यांनी सांगितले. आ. जगताप यांनी हे प्रतीक्षालय त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा प्रमुख कदम यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिल्या;
तसेच त्यांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. प्रशासकीय कार्यालयात भेट दिली असता, मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय अधिकारी संजय राठोड व कार्यालयाच्या अधीक्षक या ठिकाणी उपस्थित नव्हते. पुणे जिल्हा रुग्णालयाचा एकूण कारभार सुधारण्यासाठी डॉ. आर. के. शेळके यांना सूचना व कडक शब्दांत समज त्यांनी दिली.
व्हीएस न्यूज – टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन कंपनीच्या सुमारे सव्वाशे कामगारांना आठ हजार सहाशे रुपयांची भरीव वेतनवाढ देण्यात आली आहे. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे कामगार प्रतिनिधी आणि व्यवस्थापन यांच्यात हा करारकरण्यात आला. गेली 25 महिने रखडलेला करार अखेर झाल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. हा करार एक सप्टेंबर 2015 ते 31 ऑक्टोबर 2018 या तीन वर्षांसाठी असणार आहे.
करारानुसार पगारातील वाढीव रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वर्षी फिक्स 3400 रुपये वाढ ही देण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 9 हजार 592, दुसऱ्या वर्षी 10 हजार 882 तर तिसऱ्या वर्षी 12 हजार रुपये इतकी वेतनवाढ होणार आहे.
टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर, ताल कंपनीचे अध्यक्ष आर.एस.ठाकूर यांच्यामुळे हा करार होऊ शकला. व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य संचालन अधिकारी अमित भिंगुर्डे, शंतनू सील, सुहास कुलकर्णी आदींनी तर युनियनच्यावतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, महासचिव उत्तम चौधरी, तालचे प्रतिनिधी राम भगत, राजेंद्र पाटील आदींनी स्वाक्षरी केली. तांत्रिक सहायक म्हणून संदीप पिंगळे यांनी काम पाहिले.
व्हीएस न्यूज – संभाजीनगर येथील महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. याचाच फायदा घेवून तेथील मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मगरीची पिल्ले, अजगर, मांडूळाच्या चोरीसह त्यांच्याविषाची तस्करी करु लागले आहेत. तसेच, प्राणी संग्रहालयात दिल्ली सेंट्रल झू ऍथोरिटीच्या नियमांची पायमल्ली करुन संबंधित अधिकाऱ्यांस राहण्यास घर उपलब्ध केले आहे. विशेष म्हणजे, सर्पांसाठी खाद्य म्हणून उंदीर खरेदी केली जाते. हाफकिन या संस्थेकडून एक उंदीर 75पैशाला मिळतो. मात्र, जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल 138 रुपयाला एक उंदीर खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये संबंधितांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे, अशी टीका आता होवू लागली आहे.
दरम्यान, उंदीर खरेदी आणि सर्व अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी लोकशाही संस्थेच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. संभाजीनगर (चिंचवड) येथे महापालिकेने निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय उभाण्यात आलेले आहे.त्या प्राणी संग्रहालयाचा राज्याच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणात समाविष्ठ करण्यात आलेला आहे. दिल्लीच्या सेंट्रल झू ऍथोरिटीच्या परवानगीने बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात स्थापत्य विषयक कामे सुरु करण्यात आली. तसेच पक्षी, प्राणी यांच्या राहणीमानच्या अनुषंगानेसंग्रहालयात विविध बदल करण्यात येवू लागले आहेत. त्यानूसार प्राणी संग्रहालयात ऍनाकोंडा देखील आणण्याची तयारी महापालिकेने दर्शवली होती.
परंतु, त्या ऍनाकोंड्यास राहण्यास योग्य जागा व पुरक वातावरण नसल्याने तो प्रस्ताव अद्याप बारगळला आहे. बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सुरुवातीच्या काळातील पक्षी, प्राणी अन्यत्र स्थलातंर केले आहेत. सध्यस्थितीत काही मोजकेच प्राणी, पक्षी पाहावयास मिळतआहेत. प्राणी संग्रहालयातील मानधनावरील कर्मचाऱ्याकडून योग्य हाताळणी होत नसल्याने सर्पांसह पक्ष्यांची विक्री होवू लागली आहे. महापालिकेचे योग्य नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यामार्फत हे प्रकार वाढले आहेत. संग्रहालयातून सर्पांची चोरी होवूनही पालिकेने अद्याप धडाघेतलेला नसून त्या ठिकाणच्या अतंर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, महापालिकेने दिल्लीच्या सेंट्रल झू ऍथोरिटीच्या नियमांची पायमल्ली करुन प्राणी संग्रहालयात राहण्यास घर देतो येत नाही.पण, तरीही संबंधित अधिकाऱ्यास घर उपलब्ध करुन दिले आहे. प्राणी संग्रहालयात अधिकारी वास्तव्य करीत असतानाही पक्षी, प्राणी यांची तस्करीआणि सर्पांच्या विषाची तस्करी होवू लागली आहे. प्राणी संग्रहालयातून अजगर, मगर, मोर, मांडूळ यांची चोरी होवूनही उर्वरित प्राण्याची नोंद ठेवलेली नाही. प्राण्यांच्या खाद्य खरेदीत प्रचंड अपहार होत आहे, त्यानूसार हापकिनमधून 75 पैशाला 1 उंदीर हे सापाला खाद्य मिळतअसताना जीबी एटरप्रायझेस यांच्याकडून 138 रुपयाला 1 उंदीर खरेदी करुन लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे.याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याविषयी अधिक माहिती देण्यास संबंधित उद्यानातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
महापालिका प्राणी संग्रहालयात सर्पांची चोरी, त्यांच्या विषाची तस्करी होवूनही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले नाही, अजगराची चोरी झाल्यानंतर तीन दिवस विलंब लावून हा प्रकार दाबण्याचा प्रकार सुरु होता. सुरुवातील मगर चोरीलागेल्यानंतर त्या प्रकरणी सुरु असलेली चौकशी तपास थांबविण्यात आला, त्यानंतर पुन्हा एक मगर चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच सात मोरापैकी एक मोरही गायब आहे. सर्प उद्यानात सापांच्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले आहे. त्याशिवाय ऍनिमल किपर भरती प्रकरणातगुणांमध्ये घोळ करुन वशिलेबाजीने प्रशिक्षित नसलेल्या उमेदवाराची भरती झाल्याचे दिसून आले आहे. एवढे गंभीर प्रकार घडूनही महापालिका आयुक्त हर्डीकर हे जणु काही घडलेच नाही, अशा अविभार्वात राहिले आहेत. प्राणी व पक्षी चोरी प्रकरणाचा तपास दप्तरी दाखलकरण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत वरील प्रकरणाची तत्काळ चौकशी करुन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकशाही संस्थेचे अजय लोंढे यांनी मुख्यमंत्र्यासह आयुक्तांकडे केली आहे.
व्हीएस न्यूज चिंचवड येथील महावीर चौकात रस्ता ओलांडत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा टेम्पोने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश भोसले वय 34, रा. मंचर, शिंदेवाडी, आंबेगाव यांनी फिर्याद दिली आहे. भोसले यांचा नऊ वर्षांचा मुलगा राजवीर सोमवारी (दि.30)हा जेवण बनविण्यासाठी पाणी आणायला महावीरचौक येथून भारत पेट्रोल पंपावर चालला होता. त्यावेळी वेगाने आलेल्या एका टेम्पोने त्याला जोरदार धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या राजवीरचा मृत्यू झाला.
व्हीएस न्यूज - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी देशभरात सर्वत्र “एकता दिवस” साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्ताने पिंपरी-चिंचवड सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने आज(मंगळवार, दि.३१ रोजी) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एकता दौडचे आयोजन करण्यात आले. चिंतामणी चौक ते भेळ चौक, प्राधिकरण अशा “एक भारत, श्रेष्ठ भारत –एकता दौड”चा प्रारंभ आयुक्त श्रावण हर्डीकरयांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून चिंतामणी चौक येथून करण्यात आला.
यावेळी, चिंतामणी चौक येथे उपस्थित असलेल्या नागरिकांना आयुक्त हार्डीकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या कार्यक्रमास, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर चंद्रकांत कुलकर्णी, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, उपमहापौर शैलेजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, माधुरीकुलकर्णी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी, शंकर पाटील, रुपेश पाटील, दिपक महाजन, प्रदिप पटेल, भुषण पाटील, प्रमोद चौधरी, अनुप मोरे, प्रवीण पाटील, किरणचौधरी, रविंद्र बऱ्हाटे, डॉ. प्रशांत पाटील, किरण पाचपांडे, गौरी सरोदे, निना खर्चे, दत्ता पाटील उपस्थित होते.
या दौडमध्ये, सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठाण, समता भातृ मंडळ, गुजर स्नेहवर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठाण, लेवा पाटीदार संघ (भातृ मंडळ), लेवा पाटीदार मित्र मंडळ सांगवी, लेवा युवा संघ, लेवा संघिनी मंच, लेवा शक्ती यासंघटनांसह विद्यार्थी, क्रीडा संघटना तसेच, महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. चिंतामणी चौक येथून सुरुवात झालेल्या दौडचा समारोप भेळ चौक ते पुन्हाचिंतामणी चौक असा झाला.
यावेळी, आयुक्त हार्डीकर म्हणाले, देशाची अखंडता राखण्याचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले असून देशभरात त्यांच्या जयंतीनिमीत्त एकता दौड आयोजित केली जाते. ही दौड देशातील राष्ट्रीय एकात्मताटिकवून ठेवण्यासाठी मदत करीत असून यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होत आहे. त्यामुळे हा देश एक राहिल, देशाची अखंडता कायम राहणार असून कोणतीही शक्ती देशात दुरावा निर्माण करू शकणार नसल्याचेत्यांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या सामर्थ्याने, आपल्या बौद्धिक कौशल्याने, आपल्या राजकीय इच्छाशक्तीने देशाला एकतेचा संदेश दिला. त्यानुसार, प्रत्येक भारतीयाने देखील देशभक्तीच्या भावनेने भारताची एकता मजबूतबनवण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. देशात अंतर्गत विरोध जागृत करण्यासाठी, अनेक प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. अशा वेळी एकतेसाठी जागरूक प्रयत्न करणे आवश्यक असते, हा उद्देश्य समोर ठेवूनरॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत नगरसेवक नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबीरात १०५ बाटल्यांचे संकलन…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त मंगळवारी चिंचवडमधील आहेर गार्डन येथे केदारेश्वर प्रतिष्ठान व पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टीट्यूट ब्लॅड बँक यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १०५रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी डॉ. धर्मेंद्र गांधी, डॉ.ई.बी.पाटील, डॉ. जितेंद्र कोलते, डॉ. सदानंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कांबळे, अमोल जानुगडे, तेजंद्र गिरासे, किरण वानखेडे, दिपक पाटील आदींनीसहकार्य केले.
व्हीएस न्यूज – काळेवाडी येथील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाने धडक दिल्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता घडली.वाकड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत यशवंत कांबळे (वय.28, रा.सिद्धार्थनगर, दापोडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 10 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता डांगे चौक ते काळेवाडी या उड्डाणपुलावरुन श्रीकांत दुचाकीवरून जगताप डेअरी चौकाकडे येत होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका कारने श्रीकांतच्या दुचाकीला धक्का दिला. यामध्ये श्रीकांत गंभीर जखमी झाला.
कारचालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळी थांबला नाही किंवा श्रीकांतला रुग्णालयातही न नेता तेथून पळ काढला. इतर नागरिकांनी तातडीने श्रीकांतला दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालका विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक टी.एस.भोगम पुढील तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002