व्हीएस न्युज - पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकाकडून भवानी मंदिराकडे जाताना रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये वस्तीतील गरिब मुलांची भरलेली शाळा नजरेस पडते. हसतमुख मुले-मुली हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरविताना दिसून येतात. बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतू त्या योजना हातावर पोट असणाऱ्या गरिबांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली आहे.
या शाळेत कोणतेही वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; येथे फक्त पैशांअभावी अज्ञानाचा अंधार पसरलेल्या गरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे कार्य चालते. तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आज प्रत्येकजण उच्च शिक्षण घेऊन आपल्या करियरच्या वाटा निवडून पैसे कमविण्याचे स्वप्न पाहतो. परंतू आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा खर्या अर्थाने समाजासाठी व्हावा, म्हणून गरिबांच्या मुला-मुलींना शिकविण्याचा विचार सहसा कोणी करीत नाही. रस्त्यावरच्या कुटूंबांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलांचे शिक्षण घेणे तर अवघडच ... म्हणूनच आपण केलेल्या शिक्षणाचा उपयोग योग्य रितीने व्हावा, या कल्पनेतून त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा विडा मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी उचलला आहे.
मराठवाडा जनविकास संघाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या शाळेत जवळपास 50 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये बांधकाम मजुरांची, करचावेचक कामगारांची मुले-मुली शिकत आहेत.
आपण आतापर्यंत छोटी-मोठी मजुरीची कामे करून हातावर पोट भरवित आलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवून खर्च करण्यापेक्षा त्यांनीही छोटी-मोठी कामे करून आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांकडून व्यक्त करण्यात येते. परंतू त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतले, तर आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी करून पैसा कमवू शकतील, हा विचार या वस्तीत राहणार्या पालकांच्या गळी उतरविण्यासाठी आदिती निकम ही तरुणी दारोदारी भटकून शिक्षणाचा प्रसार करीत आहे. या शाळेत मुलांना फक्त अक्षरी धडे दिले जात नाहीत, तर त्यांचे राहणीमान लक्षात घेता आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासोबत त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही दिले जाते. मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल, असे अनेक प्रयोग तेथे चालू आहेत, असे आदिती निकम सांगतात.
या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध असणे गरजेेचे आहे, हे लक्षात अरुण पवार स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच कधी कधी तर सर्व मुलांच्या न्याहरीची ही व्यवस्था करीत असतात. या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची उत्सुकता ही आहेच, यातील विद्यार्थी हुशार देखील आहेत. या विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व सोयसुविधा मिळाल्या, तर ते भविष्यात चांगले करियर घडवतील, असा विश्वास अरुण पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम भरभरून मदत करीत आहेत. वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, कृष्णाजी खडसे, कृष्णाजी फिरके, संपत गर्जे आदीनी खारीचा वाटा उचलत अरुण पवार व आदिती निकम यांना मदत करीत आहेत.
व्हिएस न्युज - मुंबई पोलिसांच्या सेवेत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यातील संगम पुलाजवळील धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, साजन सानप असे या आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता. एक महिन्यापूर्वीच खात्यातील अंतर्गत परिक्षेद्वारे त्याची हवालदार पदावरुन उपनिरिक्षक पदावर बढती झाली होती.
दरम्यान, सानप दोन दिवसांपूर्वी गावी नाशिकला गेला होता. येथे उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एका महिलेने बलात्कार आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी त्याला अटक करुन कोठडीत ठेवले होते.
दरम्यान, कोठडीतून तो पळून गेला आणि थेट पुण्यात दाखल झाला. दरम्यान, आज त्याने पुण्यातील संगम पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. नाशिकमध्ये सानपविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, ‘सानप आणि त्याचे मित्र आपल्याला सातत्याने त्रास देत होते. सानपने आपल्यावर अनेकदा बलात्कारही केला आहे. त्याने माझ्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.’ त्यामुळे सानपवर भादंवि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
व्हीएस न्युज - संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. विजय भोसले, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. नाना रसाळ, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. मोनिका सचवाणी, अॅड. संतोष मोरे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. रामचंद्र बोराटे आदी उपस्थित होते.
अॅड. पी. एस. कांबळे म्हणाले की, देशाचे संविधान हाच आपला अभिमान असून त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य घटनेची प्रत माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी पिंपरी चिंचवड बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर यांना देण्यात आले.
यावेळी अॅड. स्मिता लांडे, अॅड. गोरख कुंभार. अॅड. सुनील कड, अॅड. योगेश थांबा, अॅड. किरण पवार, अॅड. आतिश लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. मनीषा महाजन, अॅड. किरण पवार, अॅड. सुनील कड, अॅड. आतिश लांडगे, अॅड. सुनील माने, अॅड. पी. एस. कांबळे, अॅड. जिजाबा काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी 26/11 मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गोरख कुंभार यांनी केले. स्मिता लांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
व्हीएस न्युज - रावेत येथील कारमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल जवळून उघडकीस आली.
अमोल रविंद्र शितोळे (वय ३०, रा. कासारसाई) आणि अनुपमा नवनाथ कारंडे ( वय ४१, रा. वाकड) अशी मयत दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास रावेतजवळील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल समोरील एका कारमध्ये अमोल आणि अनुपमा या दोघांचे मृतदेह आढळून आले.
दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - विक्रीसाठी आणलेला २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाच्या गांजासह एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
जुबेर मौला अत्तार (वय २९, रा. संदिप गायकवाड यांची चाळ, माळवडी, पुनवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेकडी अंमली पदार्थ विरोधी पथक हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी स्टाफसह त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी जुबेर अत्तार नावाचा तरुण संशयीतरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसून आला.
पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळीला पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन आरोपी जुबेर अत्तार याला अटक केली. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला हिंजवडी पोलीसांच्या ताब्यात दिले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, दादा धस, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - पिंपरीत गंभीर गुन्हे नावांवर असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.
शक्ती रामरतन बहोत (वय ३०, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) विशाल बबन गायकवाड (वय २२, रा. गिरजुबाबा मंदिरामागे, बौध्दनगर) मनोहर मारूती सुर्वे (वय रा. पत्राशेड, लिंकरोड), जिंतेद्र सावळाराम शिंदे (वय ३०, रा. भिमनगर, पत्राशेड पिंपरी) लक्ष्मण बाळू शिंदे (वय ३३, रा. वसंतदादा पाटील शाळेसमोर नेहरूनगर, पिंपरी) अशी तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नांवे आहेत.
वरील सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, इतर काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या पिंपरी पोलीस ठाण्यात नियुक्तीमुळे पोलीस कर्मचारी, सामाजिक, राजकिय, क्षेत्रातील लोकांमध्ये चैतन्य पहावयास मिळत असुन नागरिकांकडुन चांगला अधिकारी मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
व्हीएस न्युज - कपड्याचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवलेले तब्बल २ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली.ही घटना शुक्रवार (दि.२३) रात्री १० ते शनिवार (दि.२४) सकाळी साडेसातच्या दरम्यान अजमेरा "जे" सेक्टर शॉप नं.१ येथील वैष्णवी कलेक्शन या कपड्याच्या दुकानात घडली.
याप्रकरणी दुकानदार संभाजी धनराज मोरे (वय ३६, रा. वास्तु उद्योग कॉलनी १०/४ अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार,अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोरे यांचे अजमेरा जे सेक्टर येथे वैष्णवी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातली गल्ल्यामध्ये ठेवलेले तब्बल २ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज - पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घेण्यासाठी चार हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.२४) दुपारी चिंचवड स्टेशन येथे करण्यात आली. याप्रकरणी संदीप लक्ष्मण शेडगे (वय ३८, रा. भाऊ पाटील चाळ, बोपोडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार, अनिता संजय भापकर या महिलेस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेडगे हे मोहननगर, चिंचवड येथील सुमीत प्रा. लि. या कंपनीत फिल्ड ऑफिसर म्हणून कामाला होते. त्यावेळी तिथे साफसफाईचे काम करणाऱ्या अनिता या चोरी करीत असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक अर्जुन कांबळे यांना शेडगे यांनी दिली होती. यामुळे अनिता यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन अनिताने शेडगे यांनी आपल्याला आनंदनगर, चिंचवड येथे मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार चिंचवड पोलिस ठाण्यात केली. तसेच शनिवारी (दि.२४) शेडगे यांना फोन करुन चार हजार रुपये दिल्यास तुझ्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेते, असे म्हणत खंडणीची मागणी केली. यावर शेडगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि घडलेला घटनाक्रम पोलीसांना सांगितला.
पोलिसांनी शेडगे यांना आरोपी अनिता हिला पैसे नेण्यासाठी चिंचवड स्टेशन येथे बोलवण्यास सांगितले. ती पैसे नेण्यासाठी आली असता पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली. सहायक निरीक्षक शेवाळे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - रिक्षाचालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून तो नदीपात्रात टाकून देण्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री उघडकीस आला. रिक्षाचालकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, हल्लेखोर आणि खुनामागचे कारण अद्याप समजले नाही़ सुनील पडवळ (४५, रा. दत्तवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक चेतन चव्हाण यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजपूत वीटभट्टीजवळ नदीपात्रातील काटवनातील मोकळ्या जागेत एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी रात्री पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी कळविली़ ही माहिती मिळताच डेक्कन पोलीस घटनास्थळी गेले़.
मृतदेहाच्या डोक्यावर कठीण वस्तूने मारून त्यांचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता़ त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता़ पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला़ मृतदेह सापडला त्या परिसरात पोलिसांनी शोध घेतल्यावर रिक्षा तसेच एक डायरी सापडली़ त्यात रिक्षामालकाचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक दिला होता़ तसेच सुनील पडवळ असे स्वत:चे नावही लिहिले होते.
पोलिसांना यातील क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ती रिक्षा संदीप पासलकर यांची असल्याचे समजले. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलविण्यात आले. त्यांनी सुनील पडवळ हा त्यांची रिक्षा भाड्याने घेऊन चालवत असल्याचे सांगितले़ सुनील हा काही वर्र्षांपूर्वी मुंबईत मिलमध्ये काम करत होता. त्या वेळी त्याच्या उजव्या हाताची बोटे कापली गेली होती. पासलकर यांनी मृतदेह पाहिला. त्या वेळी बोटे कापलेली दिसली. त्यावरून त्यांनी हा सुनील पडवळ याचाच मृतदेह असल्याचे ओळखले. त्याला दारूचे व्यसन होते. तो राहण्यास दत्तवाडी भागात होता. मात्र, अनेक दिवस तो घरीच जात नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी सुनील याचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिला़ याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत़
व्हीएस न्युज - असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने संविधान दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली या वेळी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे शहर अध्यक्ष सुंदर कांबळे व महिला शहर अध्यक्षा सायरा बानू शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर चे संतोष रणसिंग , बबन शिरसाठ , नवनाथ डेंगळे ,कलिंदर शेख ,शबाना कुरेशी ,सौ शीतल कोतवाल ,सलमान शेख ,रोहन खंडागळे ,सौ. निर्मला कुशलकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हीएस न्युज - पुणे शहरात नववर्षांपासून (१ जानेवारी २०१९) हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नुकतेच जाहीर केले. वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ विचारात घेता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर प्रत्येक चौक तसेच गल्लीबोळात कारवाई करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे शहरात रस्ते अपघातात मोठय़ा संख्येने दुचाकीस्वार बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढते अपघात तसेच त्यात मृत्युमुखी पडणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण विचारात घेऊन १ जानेवारी २०१९ पासून शहरात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेल्मेट परिधान केल्यास डोक्याला होणारी गंभीर स्वरूपाची दुखापत टाळता येईल, तसेच दुचाकीस्वाराचा जीवदेखील वाचेल, असे मत पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी व्यक्त केले आहे.
पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नेमणे शक्य होणार नाही. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे सध्या एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी शहर परिसरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर १२४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सध्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट सक्ती झाल्यानंतर हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
वादाचे प्रसंगदेखील टाळता येतील!
हेल्मेट सक्तीला मोठय़ा प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षांपासून शहरात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर प्रत्येक चौकात हेल्मेट न परिधान करणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून कारवाई करण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात येईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करून संबंधित वाहनक्रमांकाच्या पाटीवरून त्याचा शोध घेण्यात येईल. त्याच्यावर करण्यात आलेली कारवाई तसेच दंडाच्या रकमेचा संदेश मोबाइल क्रमांकावर पाठवता येईल. सीसीटीव्ही कारवाईमुळे वादावादीचे प्रसंग उद्भवणार नाहीत, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
दहा महिन्यांत १ कोटी ९० लाखांचा दंड वसूल
वाहतूक पोलिसांकडून गेल्या दहा महिन्यांत हेल्मेट परिधान न करणाऱ्या ३८ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ कोटी ९० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
व्हीएस न्युज - पुण्यातील एकता भाटी यांच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला वाहतूक पोलीस राजेश शेळके यांच्या धाडसामुळे अटक करण्यात यश आले. पुणे स्टेशनवर पोलीस निरीक्षकावर गोळीबार करुन पळालेल्या आरोपीला राजेश शेळके यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अटक करण्यात आली.
शिवलाल राव असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील चंदननगर भागातील इंद्रमणी गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) यांची बुधवारी सकाळी राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी शिवलाल राव (वय ३२) आणि मुकेश राव हे दोघे झेलम एक्स्प्रेसने पळ काढणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर आरोपींनी गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांनी मुकेश रावला रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली होती. तर दुसरा आरोपी शिवलाल हा तिथून पळाला होता. त्यामुळे शिवलालचा शोध घेणे हे पोलिसांसाठी आव्हानच ठरले असते. मात्र, वाहतूक पोलीस दलात कार्यरत असलेले राजेश शेळके यांच्या प्रसंगावधानामुळे शिवलाल तुरुंगात पोहोचला.
शिवलालला कसे पकडले हे राजेश शेळके यांनी सांगितले. ते म्हणाले, संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मालधक्का चौकात एक आरोपी पळताना दिसला. त्याच्यामागे पोलीस देखील होते. त्या आरोपीने पोलिसांच्या दिशेने एकदा गोळीबार देखील केला. ते पाहून मी देखील आरोपीच्या मागे धावत गेलो. आरोपी पुन्हा चौकात गोळीबार करणार त्याच दरम्यान आम्ही एका भिंतींच्या बाजूला थांबलो. तेवढ्यात त्याने गोळीबार केला. त्यावेळी चौकात असलेले नागरिक त्या ठिकाणी आले. आरोपी शिवलाल राव हा चौकातील एका इमारतीमध्ये घुसला. आम्ही त्याच्या मागावर असल्याचे पाहताच शिवलालने पुन्हा आमच्यावर गोळी झाडली. आम्ही पुन्हा भिंतीच्या बाजूला थांबलो. प्रतिकार करण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हते. शेवटी आम्ही धाडस दाखवत आत गेलो. त्याला बाहेर पडणे काही शक्य नव्हते, असे त्यांनी सांगितले.
'आरोपी आणि माझ्यात फक्त १५ फुटाचे अंतर होते. नागरिक इमारतीच्या परिसरात जमले होते. संतप्त नागरिक शिवलालच्या दिशेने दगड फेकत होते. तरी देखील त्याने आमच्यावर पिस्तूल रोखून धरून ठेवली होती. पिस्तूलमधील गोळ्या संपल्या होत्या. शेवटी माझ्या डोक्यात नवा प्लॅन आला', असे ते सांगतात. 'मी त्याला सांगितले की पिस्तूल फेकून दे नाही तर तुला लोक दगड मारत राहतील. शेवटी त्याने काही वेळाने पिस्तूल खाली टाकली आणि मी लगेचच त्याला पकडले', असे त्यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002