राजकारणातून निवृत्त होऊन मोदींनी हिमालयात जाऊन ध्यान करावे – मेवानी
नवी दिल्ली
2017-12-21
व्हिएस न्यूज – गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात असताना गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार आणि तरुण दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते लोकांना आपले जुने कंटाळवाणे भाषण सतत ऐकवत आहेत. त्यांनी राजकारणातून आता ब्रेक घ्यायला हवा, निवृत्त व्हायला हवे. मोदींनी हिमालयात जाऊन ध्यान करावे, असा वादग्रस्त सल्ला दिला आहे.
गुजरातचा निकाल हा आमच्या आंदोलनाचा विजय असून आम्ही यापुढे विधानसभा आणि रस्त्यावर आमच्या आंदोलनावर आणखी जोर देणार आहोत तसेच भाजपची सत्ता २०१९मध्ये हटवणार आहोत. आता आमच्यासारख्या दलित, आंदोलनातून निघालेल्या तरुणांची गरज देशाला आहे. आता लोकांच्या लक्षात देशाला तोडणारे राजकारण यायला लागले आहे.
त्याचबरोबर १५० जागांचा दावा करणाऱ्या मोदी आणि शहांचा अहंकाराचा फुगा फुटला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१९ मध्ये हीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळेल असा दावाही मेवानी यांनी केला आहे.
गुजरातमधील उना येथे दलितांवर झालेल्या अत्याचारानंतर तीव्र आंदोलनातून जिग्नेश मेवानी हा तरुण दलित नेता उदयास आला. एका मुलाखतीदरम्यान जिग्नेश यांनी मोदी-शहा यांच्यावर कडाडून टीका केली. मेवानी पुढे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.