व्हिएस न्यूज - यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात दररोज सरासरी 16 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. जानेवारीपासून महाराष्ट्रात 2965 मुली बेपत्ता झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनीविधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. राज्यात 1 जानेवारी ते 30 जून दरम्यान 2965 मुली नाहिशा झाल्या. गेल्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये 2,881 मुली नाहिशा झाल्या होत्या, असे ते म्हणाले.
स्वतः गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या संदर्भात कोणत्याही विशिष्ट टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र 12 पोलिस विभागांना अशा प्रकारांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेपत्ता मुलांचा माग काढण्यासाठी केंद्र सरकारने www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे, तसेच रेल्वेनेही www.shodh.gov.in हे पोर्टल अद्ययावत केले आहे. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी या संकेतस्थळांची मोठी मदत होत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन स्माईल यांसारख्या चार विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 30 जून 2016 1,613 मुलींना शोधण्यात मदत झाली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी 645 मुलींना शोधण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.