राज्यातील सर्व खात्यांच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना अजित पवारांनी भरला दम
नागपूर
2017-12-22
व्हिएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील सर्व खात्यांच्या मस्तवाल अधिकाऱ्यांना दम भरत कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अपमान यापुढे केला तर याद राखा. हे सभागृह त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले आहे.
नाशिकमधील तहसिलदाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार दीपिका चव्हाण यांचा अपमान केला होता. त्यामुळे दीड वर्षापूर्वी त्यांच्यावर विशेष अधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव आणला गेला होता. परंतु, दीड वर्ष झाले तरी त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचा मुद्दा सभागृहामध्ये चर्चेला आला. पक्षनेते अजित पवार या मुद्यावर आक्रमक झाले. सदस्यांना अधिकारी अशी वागणूक कशी देऊ शकतात. मस्तवालपणा करणाऱ्या आणि चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. तो अधिकारी दीड वर्षाने कसा काय मॅटमध्ये जाऊ शकतो, असा संतप्त सवाल करत पवार यांनी सभागृहातील सर्व सदस्यांची बाजू घेतली.
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही विशेषाधिकार भंगाच्या मुद्यावर या चर्चेत भाग घेत, सदस्यांचे अधिकार अबाधित राखण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सदस्यांच्या हक्काबाबत सभागृहामध्ये मांडलेल्या मुद्द्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. आमदारांच्या हक्कांचे जर विशेषाधिकार समिती संरक्षण करू शकत नसेल, तर ही समितीच बरखास्त करावी, असा संताप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.