महाबळेश्वरच्या जंगलात तरूणांची रेव्ह पार्टी; पोलिसांनी टाकली धाड
सातारा
2017-12-22
व्हिएस न्यूज - महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरातील जंगलात सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी तरूण-तरूणींना ताब्यात घेतले आहे. लिंगमळ्याच्या जंगलात बुधवारी रात्री ही पार्टी सुरू होती. या पार्टीत सहभागी झालेले बहुतेक तरूण-तरुणी या उच्चभ्रू वर्गातील आहेत. पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा तरूण-तरूणी याठिकाणी गाण्यांवर बिभत्सपणे नृत्य करत होते. यावेळी आठ युवकांना दोन तरूणींसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत. काही लोकांना जंगलाच्या दिशेने अलिशान गाड्या जाताना दिसल्याने या रेव्ह पार्टीचा सुगावा पोलिसांना लागला. तीन गाड्यांमधून हे सर्वजण येथे आले होते. प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीत सहभागी झालेले तरूण-तरूणी दिव-दमण आणि अहमदनगर येथील मोठ्या कुटुंबातील असल्याचे समजते. या पार्टीचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ट्रेकर्सना सोबत घेऊन जंगलात शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी जंगलाच्या आतील निर्मनुष्य भागात पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. दरम्यान, ही हुक्का पार्टी होती किंवा रेव्ह पार्टी हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.दरम्यान, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात पोलिसांकडून अशाप्रकारच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. सरत्या वर्षांला नशेत निरोप देऊन धुंदीतच नववर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह आसपासच्या शहरांत सध्या छुप्या रेव्ह पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. शहराबाहेरील ठिकाणांसह पब किंवा नाइट क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पाटर्य़ासाठी समाजमाध्यमांवरून सांकेतिक निमंत्रण पाठवण्यात येत असून या निमंत्रणांमध्ये पार्टीतील अमली पदार्थाचीही कल्पना देत असल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही बाब लक्षात आल्याने पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने समाजमाध्यमे तसेच अशा पार्टीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.