आरबीआयचा तिरुपती देवस्थानाला जुन्या नोटा बदलून देण्यास नकार
तिरुपती
2017-12-23
व्हिएस न्यूज - नोटाबंदीनंतर रद्द केलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तिरुमला तिरुपती देवस्थानाला नकार दिला आहे. इतकेच नाही, तर देवस्थानाने या नोटा आरबीआयच्या कार्यालयात पाठवाव्यात आणि त्याच्या कुरियरचा खर्च स्वतः भरावा, असेही सुनावले आहे.
आरबीआयने गुरुवारी तिरुपती येथे बँक अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी देवस्थानाच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्दा त्यांच्यासमोर उपस्थित केला.
तिरुपती देवस्थानाकडे सध्या 26 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. चलनातून रद्द केलेल्या नोटा सध्या तरी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बदलून देणे शक्य नसल्याचे यावेळी आरबीआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
देवस्थानाला दररोज त्याच्याकडे जमा होणारे नाणे बँकांमध्ये जमा करावे लागतात. यापैकी 2011 साली चलनातून बाद केलेले 25 पैसे, 5 पैसे, 20 पैसे आणि 10 पैशांची नाणी मुंबईतील टाकसाळीला पाठवण्यास आरबीआयने सांगितले. तसेच तिरुपती देवस्थानात 40 टन वजनाची परदेशी नाणी साचली आहे. त्यांची व्यवस्था देवस्थानाने स्वतः पाहावी, असे आरबीआयने म्हटले आहे.