व्हिएस न्यूज – शालीमार पार्कमध्ये पाच दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाचा आता पुन्हा एकदा राजधानी दिल्ली सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. पाच अल्पवयीन मुलांनी एका वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जहांगिरपूरी येथे पालिकेच्या कचरा डेपोजवळ घडली. तरुणीने या प्रकरणी जहांगिरपूरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या पाच मुलांनी रात्री दहाच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुलीला ढकलले. नंतर जबरदस्तीने एमसीडी इमारतीच्या मागच्या बाजूला नेऊन या पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच, आरडा-ओरडा केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने बुधवारी दुपारी पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी मुले ही तरुणी राहत असलेल्याच वसाहतीच्या जवळ राहणारी आहेत. ही मुले शाळाबाह्य असून कचरा डेपोवर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.