व्हिएस न्यूज - सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तसेच पुढील कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितले.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाकडून होत होती, तर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून होत होती. मात्र, याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठाला कोणाचेही नाव देण्याचा निर्णय झाला नसल्याचे जाहीर केले होते. दोन समाजात तेढ वाढत असल्याने याबाबत सरकारी पातळीवरून वेगवेगळी विधाने केली जात होती.
मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही विनोद तावडे यांनी अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती या अधिवेशनादरम्यान दिली होती. अखेर यासंदर्भात विरोधकांनी व धनगर समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न लावून धरला.
त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागपूरमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली. तसेच त्यासाठीच्या पुढील कार्यवाहीसाठी एक उपसमिती स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.