व्हिएस न्यूज -अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कंपनीचा मुंबई उपनगरासाठीचा वीज निर्मिती, वीज पारेषण आणि वीज वितरणाचा व्यवसाय गुजरातमधील प्रख्यात अदानी समूह विकत घेणार आहे. या समूहातील अदानी ट्रान्स्मिशन लिमिटेड कंपनी त्यासाठी तब्बल १३,२५१ कोटी रुपये रिलायन्सला देणार आहे. मार्च २०१८ पर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊन एप्रिल २०१८ पासून अदानी या व्यवसायाचा ताबा घेईल, असा अंदाज आहे.
अनिल धीरूभाई अंबानी समूह आर्थिकदृष्ट्या संकटात असून मार्च २०१७ अखेर समूहातील विविध कंपन्यांवर एकूण सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे आपले विविध व्यवसाय विकून कर्जातून मुक्त होण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अखत्यारीतील डहाणूचा ५०० मेगावॉटचा वीज प्रकल्प, वीज पारेषण यंत्रणा आणि मुंबईतील वीज वितरण व्यवसाय असा एकात्मिक वीज व्यवसाय विकण्यासाठी उभय समूहांत बोलणी सुरू होती. मुंबई उपनगरात रिलायन्सचे सुमारे ३० लाख वीज ग्राहक असून सरासरी विजेची मागणी १८०० मेगावॉट आहे. वीज वितरणातून वर्षाला सरासरी ७५०० कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळतो.
रिलायन्सने गुंतवलेल्या भागभांडवलपोटीचे ५५० कोटी रुपयेही अदानी समूह रिलायन्सला देईल. याशिवाय वीजदरवाढीसारख्या महसुली विषयावरील सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या अर्जाची सुनावणी विविध नियामक संस्थांकडे सुरू आहे. ते मंजूर झाल्यावर सर्व पाच हजार कोटी रुपये रिलायन्सकडे येतील. अशा रितीने या व्यवहारातून रिलायन्सला एकूण १८ हजार ८०० कोटी रुपये मिळणार आहेत, असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिका-यांनी सांगितले.
सध्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे या व्यवहारानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कर्जमुक्त होईलच शिवाय तीन हजार कोटी रुपयांची गंगाजळी कंपनीच्या तिजोरीत येईल. कर्जमुक्तीसाठीचा कार्पोरेट क्षेत्रातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे सांगण्यात आले. या व्यवहारानंतर कर्जमुक्त झालेली रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर संरक्षण उत्पादनांच्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
आर्थिक चणचणीतूनच मेसर्स रिलायन्स एनर्जीने वीजग्राहकांकडून वसूल केलेली विद्युत शुल्क आणि वीजकराची तब्बल १४५२ कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारकडे जमा न करता थकवल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते.