व्हिएस न्यूज – आपण अन्न वाया घालवितो पण तेच अन्न कोणाचे तरी पोट भरू शकते. एकदम साधा विचार मुंबईच्या डबेवाल्यांनी मांडला जगाची एकूण लोकसंख्या ७०० कोटी आहे. यापैकी ११ टक्के म्हणजेच ७९ कोटी ५० लाख लोक उपाशी आहेत. अमेरिका, इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असणा-या देशांच्या एकूण लोकसंख्येएवढे लोक जगात उपाशी असतात. यापैकी भारतात उपाशी राहणा-यांची संख्या तब्बल १९ कोटी ५० लाख एवढी आहे. म्हणजेच २० लाख लोक आणखी मिळवून अख्खा पकिस्तान देश उपाशी राहील एवढी ही प्रचंड संख्या आहे. भारतात तर दररोज ३ हजार मुले कुपोषणाने मरतात.
मुंबईत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. एका बाजूला नवकोट नारायणांच्या मोठमोठय़ा पाटर्य़ा, विवाह सोहळे होतात. या सोहळ्यात मोठय़ा प्रमाणात अतिरिक्त जेवण बनवले जाते. पार्टी संपली की मग हे अतिरिक्त जेवण कच-यात फेकले जाते, तर दुस-या बाजूला उपाशीपोटी फुटपाथवर झोपणा-यांची संख्या लक्षणीयरीत्या मोठी आहे. काही ठिकाणी तर गरीब अनाथ मुले कच-याच्या डब्यातून अन्न वेचून खातात.
ही परिस्थिती बदलण्यासाठी सुभाष तळेकर आणि त्यांच्या डबेवाल्या सहका-यांनी पुढाकार घेतला आणि रोटी बँकेची स्थापना केली. यासाठी तळेकर यांनी अतिरिक्त शिल्लक अन्न फेकून न देता आम्हा डबेवाल्यांना तुम्ही फोन करा. फोन केल्यानंतर आमचा डबेवाला आपल्याकडे सायकलवरून येत आपले अतिरिक्त जेवण जवळील भुकेलेल्यांना वाटील, असे मुंबईकरांना आवाहन केले. सुभाष तळेकर यांच्या या संकल्पनेनुसार दोनशेहून अधिक डबेवाले हे काम करण्यासाठी आपणहून पुढे आले.
मुंबईकरांचाही डबेवाल्यांवर विश्वास असल्यामुळे दररोज शिल्लक राहिलेले अन्न घेऊन जा, असे सांगणारे २० ते २५ फोन दररोज येऊ लागले. शनिवार व रविवारी तर हा आकडा ४० ते ५०च्या घरात जातो. अशा प्रकारे मुंबईचा डबेवाला दररोज सरासरी ३०० लोकांना अन्न वाटतो. शनिवार-रविवारी तर सरासरी ६०० लोकांना अन्न वाटतो. भुकेल्यांची भूक भागविण्याचे स्तुत्य काम सुभाष तळेकर व त्यांचे डबेवाले सहकारी करत आहेत.
विषेश म्हणजे पाच-सहा लोकांचे अन्न असेल तर डबेवाला ते अन्न सायकलवर सहज आणतो व त्याचे वाटप करतो. पण हेच अन्न वीस-पंचवीस जणांचे असले की डबेवाल्यांची पंचायत होते. हे अन्न सायकलवर नेता येत नसे त्यासाठी त्याला टॅक्सी किंव्हा रिक्षा करावी लागे. त्याचे भाडे आपल्या खिशातून द्यावे लागे. विनामोबदला काम करणा-या डबेवाल्याच्या मदतीला महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक शिवानंदनसाहेब आले.
त्यांनी एक व्हॅन रोटी बॅन्केला देऊन त्यांचा खर्चही त्यांनी उचलला आहे. याचे अनावरण शनिवारी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक शिवानंदनसाहेब यांच्या हस्ते झाले. तसेच ही रोटी बँकेची चळवळ स्थानिकांच्या मदतीने संपूर्ण भारतभर पसरवण्यात येईल. या कामासाठी रोटी बँकेचा २४ तास उपलब्ध असलेल्या ८६५५५८०००१या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क करा, वा www.rotibankindia.org या संकेतस्थळाला भेट द्या.