व्हिएस न्यूज – मद्यपी वाहनचालकांमुळे होणा-या वाढत्या अपघातांची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवताना एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या चालकास यापुढे थेट सात वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तशी तरतूद सुधारित मोटार वाहन कायद्यात करण्यात येणार आहे.
सध्याच्या कायद्यानुसार, दारूच्या नशेत गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणा-यांवर कलम ३०४अ खाली (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत) गुन्हा नोंदवला जातो. त्या अंतर्गत दोन वर्षाचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जातात. मात्र, ही शिक्षा अपुरी असून अशा गुन्ह्यांसाठी अधिक कठोर शिक्षा व्हायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी व्यक्त केले आहे.
संसदेच्या स्थायी समितीनेही असेच मत मांडले आहे. मृत्यूस कारणीभूत ठरणा-या मद्यपी वाहनचालकांवर १० वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद असणारा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस या समितीने केंद्रीय परिवहन खात्याला केली होती. गृहखात्यापुढेही तसा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या सा-याला अनुसरून मोटार वाहन (सुधारणा) विधेयकात काही सुधारणा अपेक्षित आहेत. शिक्षेतील वाढ ही त्यातील प्रमुख शिफारस आहे.
देशातील एकूण वाहनांपैकी अध्र्या वाहनांचे थर्ड पार्टी इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही. यात दुचाकींची संख्या मोठी आहे. अशा वाहनांमुळे झालेल्या अपघातातील जखमींना कसलीही भरपाई मिळत नाही. त्यामुळे नोंदणीच्या वेळीच थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्याचाही सरकारचा विचार आहे.