व्हिएस न्यूज – टोलनाक्यावर टोल भरणा-या वाहनांची रांग तेथील पिवळ्या रेषेच्या बाहेर गेल्यास टोल न आकारताच वाहने सोडायला हवीत. यानुसार वाहने न सोडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
टोलवसुलीमुळे विविध महामार्गांवर वाहतुकीची रोजच्या रोज कोंडी होऊन वेळ आणि इंधन मोठय़ा प्रमाणावर वाया जाते. या विषयच्या सततच्या तक्रारीनंतर त्यावर उपाय म्हणून टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेचा नियम करण्यात आला. त्यानुसार, टोलनाक्यापासून दहा वाहने उभी राहतील इतक्या अंतरावर एक पिवळी रेषा आखण्यात आली. या रेषेबाहेर वाहनांची रांग लागल्यास टोलवसुली न करता वाहने सोडा, असा नियम करण्यात आला. मात्र, अनेक टोलनाक्यांवर हा नियम पाळला जात नाही.
पिवळ्या रेषेच्या नियमाबाबतचा सरकारचा जीआर आम्हाला मिळाला नसल्याचे सांगत ऐरोली टोलनाक्यावरही शनिवारी नियमबाह्य पद्धतीने वसुली केली जात होती. त्यामुळे मनसेने तिथे आंदोलन करून टोलवसुली बंद पाडली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी वरील आदेश दिले. टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. नियमांचे पालन न करता टोलवसुली करणा-या कंपन्यांवर कठोरात कठोर कारवाई करू, असे शिंदे यांनी सांगितले.