भाजपमध्ये वेडा आणि खुनी सोडला तर सर्वांना प्रवेश – हरिभाऊ बागडे
औरंगाबाद
2017-12-26
व्हिएस न्युज – मुलीसाठी मुलगा पाहायला जाताना पुर्वी जेवढी चौकशी केली जायची, तितकीच चौकशी एखाद्या व्यक्तीला पक्षात कार्यकर्ता म्हणून घेताना केली जायची. पण आपल्या पक्षात मात्र ज्याच्यावर खूनाचा गुन्हा आहे आणि जो वेडा अशा या दोन व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाला प्रवेश दिला जातो, अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
शहरातील सिमंत मंगल कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बागडे बोलत होते.
जनसंघाचे बराच काळ म्हणजे आणीबाणीच्या काळापर्यंत अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष होते. त्यावेळी जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. पण आज परिस्थिती जरा वेगळी आहे, समाज बदलला आहे, त्यानूसार पक्षही बदलला. आता पक्षात कुणालाही घेतले जाते म्हणत हरिभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली.
पक्षात वेडा आणि खुनी अशा दोन प्रकारच्या व्यक्ती सोडल्या तर सगळ्यांनाच प्रवेश दिला जातो असा जोरदार टोला देखील हरिभाऊ बागडे यांनी यावेळी लगावला. राज्य व देशभरात भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इतर पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाचा विस्तार करण्याच्या नावाखाली प्रवेश दिला जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी यावरून भाजपवर टिकेची झोड उठवली असतानाच हरिभाऊ बागडे यांनी केलेली टिका भाजपला अडचणीची ठरू शकते.