व्हिएस न्यूज - चार्ली चॅप्लीन त्यांच्या सहाबहार विनोदी चित्रपटांसाठी जगभरातील प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहेत. आपल्या नर्मविनोदी शैलीने मूकपटातूनही सामाजिक व्यंगे दाखवून देणारे चार्ली हसता हसता कधी प्रेक्षकांचे डोळे ओले करत हे लक्षातही येत नसे. २५ डिसेंबर १९७७ ला म्हणजे नाताळच्या दिवशीच वयाच्या ८८ व्या वर्षी या दिग्गज कलाकाराचा मृत्यू झाला होता. त्यालाही आता ४० वर्षे झाली. मात्र त्यांच्या मृतदेहाशी संबंधित अशी एक घटना आजही अनेकांच्या स्मरणात असेल. यामुळे कांही जणांची करमणूकही झाली होती.
झाले असे की चार्लीना मृत्यूनंतर स्वित्झर्लंडमधील कोर्सिचर सर वेबे येथे दफन केले गेले मात्र तीन महिन्यातच त्यांचा मृतदेह चोरट्यांची पळवून नेला होता.चोरट्यांनी चॅप्लीनच्या पत्नीकडे म्हणजे उना कडे मृतदेह परत मिळण्यासाठी खंडणी मागितली. उनाने सरळ पोलिसांना बोलावले व पोलिसांनी दोघा जणांना पकडून मृतदेह ताब्यात घेतला. या चौरांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की त्यांना पैशांची तंगी होती व चॅप्लीनच्या मृतदेहाबद्दल मिळालेल्या खंडणीतून चांगलासा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. अर्थात ही संधी त्यांना मिळाली नाही मात्र विनोदवीर चार्ली यांच्यावर दोन वेळा दफन करून घेण्याची वेळी आली. या मृतदेहाचे पुन्हा स्वित्झर्लंडमधील विलेज ऑफ नोविले येथे दफन करण्यात आले व पुन्हा असला काही प्रकार घडू नये म्हणून काँक्रीटने ही जागा बंद करण्यात आली.