व्हीएस न्यूज - महाबळेश्वर मध्ये सुटी घालविण्यासाठी गेलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आवाजाचा त्रास झाला म्हणून महाबळेश्वर मधील एक रिसॉर्ट सील केले गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. अर्थात हे रिसॉर्ट सील करण्यामागे प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण दिले गेले असले तरी कोणत्याही हॉटेलवर इतक्या तातडीने कारवाई केल्याची ही पहिलीच घटना असल्याने त्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे महाबळेश्वर येथे होते तेव्हा शेजारीच असलेल्या एव्हरशाईन रिसॉर्टमध्ये डीजे सुरू होता. त्या आवाजाचा त्रास ठाकरे यांना झाला तेव्हा स्थानिक शिवसेना नेत्यांनी आवाज कमी करण्याची सूचना दिली मात्र रिसॉर्टने ती धुडकावून लावताच त्वरीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना माजी नगराध्यक्ष व सेना नेते डी.एम. बावडेकर यांनी फोनवरून माहिती दिली. या संदर्भात सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल गेली गेली व शनिवारीच हे रिसॉर्ट सील केले गेले.
रामदास कदम यांनी मात्र या रिसॉर्टमधील २७ खोल्या अनधिकृत बांधल्या गेल्या असल्याचे तसेच वॉटर रिसायकलींग सुविधा नसल्याचे व महाबळेश्वर हे शांत क्षेत्र घोषित केले गेल्याने आवाजाला बंदी असल्याचे कारण रिसॉर्ट सील करण्यामागे असल्याचे सांगितले. त्यापुढे त्यांनी मुंबईतील ३० हॉटेल्स तसेच लोणावळा येथील हॉटेल्सवरही अशी कारवाई करण्यात येणार असल्याची पुस्तीही जोडली. विशेष म्हणजे सेनेचे युवा नेते आदित्य मुंबईत रात्रभर पब्ज व हॉटेल्स खुली ठेवण्यासंदर्भात चळवळ करत असताना महाबळेश्वर मधील रिसॉर्टवर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002