अल्पेश ठाकोर यांचा महाराष्ट्राला भाजपमुक्त करण्याचा निर्धार
ठाणे
2017-12-27
व्हिएस न्यूज – गुजरातमधील अनाचार संपविण्यासाठीच जिग्नेश आणि हार्दिकने माझ्यासोबत झंझावात निर्माण केल्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याचा दावा गुजरातचे नवनिर्वाचित आमदार अल्पेश ठाकोर यांनी मुंब्य्रातील एका कार्यक्रमात केला. तसेच देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानाला भाजपच्या एकाधिकारशाहीमुळे धोका निर्माण झाला असल्यामुळेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या लढय़ाला साथ देऊन महाराष्ट्र भाजपमुक्त करण्याचा इशाराही दिला.
आमदार अल्पेश ठाकोर मंगळवारी रात्री मुंब्रा येथील मित्तल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मुशायरा कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना भाजपवर टीका केली. देशात अराजकता माजली असून सध्या दहशतीखाली दलित, अल्पसंख्याक वर्ग जगत असून भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. बहुसंख्याक जनतेला ठरावीक वर्गाच्या हितासाठी वेठीस धरले जात आहे. संविधानाला हा प्रकार धोकादायक असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. संसदीय लोकशाहीला राक्षसी बहुमताच्या जोरावर जनविरोधी नीतींचा अवलंब केला जात असल्यामुळेच धोका निर्माण झाला असल्यामुळेच जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल यांनी माझ्यासोबत भाजपला गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आव्हान दिल्याने त्यांची पीछेहाट झाल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.