व्हीएस न्यूज - नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिजर्व बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
निगडी प्राधिकरण येथील रहिवासी रणजीत इंगळे यांनी त्यांचे एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड २०१६ मध्ये बंद केले. त्यासाठी लागणारी रक्कम धनादेशाद्वारे बँकेत जमा केली. मात्र त्यानंतरही इंगळे यांना त्यांच्या मोबाईलवर वेळोवेळी बँकेकडून पैसे भरण्यासाठी विचारणे केली जाऊ लागली. यावर इंगळे यांनी बँकेत जाऊन आपण रक्कम भरली असल्याचे सांगितले. मात्र तरीही बँकेने इंगळे यांचे एचएडीएफसी बँकेतील बचत खात्यातून परस्पर आठ हजार रुपये रोखून धरत ते पुढे काढून घेतले. याप्रकरणी इंगळे यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडेही तक्रार केली, त्यांना मेल केले. मात्र त्या मेलला कोणतेही उत्तर न देता परस्पर तक्रार निकाली काढल्याचे बँकेने एसएमएसद्वारे सांगितले. यावेळी इंगळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ल यांना आपल्या सोबत झालेल्या फसवणुकीची माहिती निवेदनाद्वारे दिली. तेच निवेदन पुढे इंगळे यांनी थेट रिजर्व बँक ऑफ इंडियाला दिले. इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत आरबीआयने इंगळे यांनी जागरूकपणे तक्रार केल्याबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या तक्रारीचे कायदेशीर पद्धतीने निवारण केले जाईल व त्याची माहितीही त्यांना दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. एका तक्रारीमुळे खासगी बँकांच्या मनमानी काराभाराला आळा बसेल असे मत इंगळे यांनी व्यक्त केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002