व्हिएस न्यूज – माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या देशभक्तीबद्दल कोणतीही शंका नाही. मनमोहन सिंह आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या देशाशी असलेल्या बांधिलकीबाबत कोणतेही प्रश्न चिन्ह उपस्थित केलेले नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत केल्यानंतर विरोधकांच्या विरोधाची धार कमी झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बेफाम आरोप करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह, हमीद अन्सारी आणि मणिशंकर अय्यर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. ‘‘मला पदावरून हटवण्यासाठी मणिशंकर अय्यर यांनी पाकमधून सुपारी घेतली होती, असा आरोप मोदींनी प्रचारसभेत केला होता. अय्यर यांच्या घरी पाक अधिका-यांसोबत बैठक झाली आणि दुस-या दिवशी मला हिणवले. गुजरातमध्ये निवडणूक सुरू असताना ही बैठक का घेतली, या बैठकीत मनमोहन सिंग, हमीद अन्सारी आदी मंडळी का उपस्थित होती.’’ असे मोदी म्हणाले होते.
त्यावरून राज्यसभेत गेले अनेक दिवस गोंधळ सुरू होता. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. नरेंद्र मोदी यांनी संसदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस खासदारांनी लावून धरली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेस खासदारांनी या मागणीवरुन सभागृहात गदारोळ घातला.
शेवटी बुधवारी राज्यसभेत अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांची देशाशी असलेल्या बांधीलकीवर प्रश्न उपस्थित केलेले नाही किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांचा हेतूदेखील नव्हता. ते दोघेही ज्येष्ठ नेते असून त्यांची देशाशी असलेल्या बांधीलकी सर्वश्रृत आहे, असे त्यांनी सांगितले.