व्हिएस न्यूज – पाच वर्षांपूर्वी मुंबईमध्ये पाळीव तसेच भटक्या प्राण्यांमध्ये कुत्र्यांची संख्या सर्वाधिक होती. आता मात्र त्यांची जागा मांजरींनी गेतल्याचे समोर येत आहे. पाळीव मांजरांपेक्षा तिप्पट संख्येने रस्त्यावर भटकणा-या मांजरींच्या संख्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दूध पिऊन, मासे खाऊन गपगुमान पडून राहणा-या या मांजरांमुळे डोक्याला काही ताप नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र मांजरांची ही वाढती संख्या अशीच वाढत राहिली तर त्यामुळे श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. मांजरीचे केस मोठय़ा प्रमाणात गळतात. ते लहान मुलांच्या तोंडात गेले वा त्यावरील धूलिकण नाकात गेले तर त्वचा आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात, याकडे प्राण्यांच्या डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. याच कारणांसाठी अनेकांनी घरात पाळलेल्या मांजरींनाही रस्त्यावर सोडून देण्यास सुरुवात केली आहे.
प्राण्यांच्या रुग्णालयांमध्ये विविध प्रकारचे पाळीव, भटके तसेच सोडून दिलेले, जखमी प्राणी उपचारांसाठी आणले जातात. पूर्वी दिवसाला दोन ते तीन मांजर उपचारांसाठी रुग्णालयात आणल्या जात होत्या, आता हेच प्रमाण वाढून दहा ते बारावर गेले आहे. मांजरींची वाढती संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतेही कार्यक्रम हाती घेतले जात नाहीत. कुत्र्यांप्रमाणे मांजरींचीही गणना व्हावी, त्यांच्या प्रजातींची नोंद राहावी यासाठी बाई साखराबाई दिनशॉ पेटीट रुग्णालयाचे सचिव डॉ. खन्ना यांनी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
आता मांजरींसाठी तीन वॉर्ड
मांजरी अधिक पिलांना जन्म देत असल्याने त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. वैद्यकीय कारणांसाठी रुग्णालयात येणा-या मांजरांची संख्या कुत्र्यांपेक्षा अधिक आहे. पूर्वी रुग्णालयामध्ये मांजरांसाठी एक वॉर्ड राखीव ठेवण्यात आला होता. आता मांजरांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णालयात तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. रात्री-अपरात्री मांजरी सोडण्यासाठी येणा-या प्राणीमित्र मुंबईकरांची संख्याही मोठी आहे. अशा मांजरांना सांभाळण्यासाठी एक विशेष कक्षही बनवण्यात आला आहे.