व्हिएस न्युज - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपातून तीन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सहा जणांवरील मोक्काचा आरोप हटविण्यात आला आहे. आता त्यांच्या विरोधात केवळ बेकायदा शस्त्र बाळगल्याचा खटला चालणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी आणि शिवनारायण कालसंग्रा या तिघांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे यांच्यावरील अनेक कलमेही हटवण्यात आली आहेत. दोघांवर केवळ शस्त्रास्त्र अधिनियमाअंतर्गत खटला चालणार आहे. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास १०० जण जखमी झाले होते. मालेगावात एका बाईकमध्ये बॉम्ब लावून हा स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणे आणि कट रचल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.
एनआयएने साध्वी प्रज्ञासिंहसोबत सहा जणांना क्लीनचिट दिली होती. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितलाही जामीन मंजूर झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने ९ वर्षापासून तुरुंगात असलेल्या कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला. एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी या सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना जामिन मिळाला आहे. त्यांच्यावर आता फक्त बेकायदा शस्त्र बाळगल्याचा खटला चालणार आहे.