व्हिएस न्युज - साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या वसंतराव नाईक महामंडळाच्या लातूर शाखेचा व्यवस्थापक प्रेमसिंग गोबरा राठोड याला पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. याप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.नाईक महामंडळाच्या लातूर शाखेत २०१४ ते २०१७ या काळात प्रेमसिंग राठोड जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याची बदली झाल्यानंतर शैलजा काळे या पदावर रुजू झाल्या. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पाहणी केली तेव्हा काळे यांना लातूर शाखेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. यात ३ कोटी ६८ लाख ७७११९ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. काळे यांनी या प्रकरणाची ५ नोव्हेंबर २०१७ रोजी लातूरच्या गांधी चौक ठाण्यात फिर्याद दिली. मात्र मुख्य आरोपी प्रेमसिंग राठोड याच्यासह इतर तीन आरोपी फरार होते.
प्रेमसिंग राठोड याची सध्या हिंगोली आणि परभणी येथे नियुक्त करण्यात आली होती, असे नाईक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते.
या मोठ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही महामंडळाकडून राठोड याच्यावर मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे आश्चर्य व्यक्त होत असताना सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान हाके याच्या पथकाने मंगळवारी रात्री राठोड याला अटक केली. या प्रकरणात अटकसत्र सुरू झाल्यामुळे या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांत आता धास्ती पसरली असून तपासात या सर्व गैरव्यवहाराच्या सुरस कथा बाहेर येण्याची शक्यता आहे.