कमला मिल आग प्रकरण : पाच अधिकारी निलंबित
व्हीएस न्यूज - कमला मिल आवारातील आग दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित मालक-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तत्काळ सुरक्षा ऑडिट करण्यासह विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002