व्हिएस न्यूज - भाजपाचे नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख आणि मुंबई पालिकाच लोअर परळ येथील कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोज’ या दोन हॉटेलला लागलेल्या आगीला जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. आपले राजकीय वजन वापरून कमला मिलमधील ‘मोजोस’ या पबला देशमुख यांनी परवाने मिळवून दिले होते. तसेच या आमदाराच्या आशीर्वादाने तिथे अनधिकृत बांधकामसुद्धा झालेले होते, असा दावाही त्यांनी केला आहे.
देशमुख यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे. याबाबत निरुपम यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून पुरावे असल्यास त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान निरुपम यांना आमदार सुधाकर देशमुख यांनी दिले.
या प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसून सध्या कोणतेच काम निरुपम यांना नसल्याने ते नवनवीन आरोप करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीत सत्य समोर येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.