कोणी काहीही बोलू पण मी पक्ष सोडणार नाही – नितीन पटेल
अहमदाबाद
2017-12-31
व्हिएस न्यूज – मंत्रीपदाची जबाबदारी कमी केल्यानंतर नाराज झालेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी माध्यमांसमोर बाजू मांडली. त्यांनी यावेळी काही झाले तरी पक्ष सोडणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे पटेल पक्ष सोडणार किंवा राजीनामा देणार, या चर्चेवर पडदा पडला आहे.
स्वत:चे मत पक्षाच्या नेत्यासमोर मांडले असून मंत्रीपद वाटप किंवा स्वत:चा प्रभाव, हा प्रश्न नाही, तर सन्मान महत्त्वाचा आहे. माझा पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. पक्षासाठी ४० वर्ष काम केले आहे. पूर्ण आयुष्य भाजपसाठी घातले आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशा शब्दांत पटेल यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
अद्यापही आपल्या खात्यांचा पदभार पटेल यांनी स्वीकारलेला नाही. पटेल अर्थ खाते न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. पटेल हे अपेक्षित खाते न मिळाल्यास बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. पटेल यांच्याकडे आनंदीबेन आणि रुपाणी सरकारच्या काळात अर्थ खात्याचा पदभार होता. नवीन मंत्रीमंडळात अर्थ खात्याचा कारभार सौरभ पटेल यांच्याकडे सोपविण्यात आला. आरोग्य, नर्मदा, कल्पसर आणि पाटनगर प्रकल्प योजनेचा कारभार नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात पटेल यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत.