व्हीएस न्यूज – भारताच्या परराष्ट्र सचिवपदी मराठमोळे आयएफएस अधिकारी विजय केशव गोखले यांची निवड झाली आहे. चीनमध्ये गोखले यांनी भारतीय राजदूत म्हणून काम केले आहे. त्यांची डोकलाम वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका होती. गोखले यांच्या नियुक्तीबाबत अधिकृत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
पुढील २ वर्षांसाठी महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले गोखले भारताचे परराष्ट्र सचिव असणार आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी विद्यमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर जयशंकर यांच्याकडून परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे विजय गोखले स्वीकारतील.
भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९८१च्या बॅचचे विजय गोखले हे अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र खात्यात सचिव (आर्थिक घडामोडी) पदावर कार्यरत आहेत. गोखले यांनी याआधी जर्मनी, हाँगकाँग, चीन आणि मलेशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. गोखले यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने परराष्ट्र सचिवपदावर नियुक्ती केली आहे. डोकलाम वादात गोखले यांचे नाव चर्चेत आले होते. गोखले यांनी या वादात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.