चांगली सेवा मिळवण्यासाठी खिसा खाली करावा लागेल – गडकरी
मुंबई
2018-01-02
व्हिएसन्यूज – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना चांगली सेवा मिळवण्यासाठी थोडा खिसा खाली करावाच लागेल, असे वक्तव्य केले आहे. गडकरी यांनी हे वक्तव्य प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान टोलवसुलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोलमध्ये सूट मिळणार नसल्याचे गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे.
मी टोल वसुली बंद झाली पाहिजे, यावर सहमत आहे. पण तुर्तास राष्ट्रीय महामार्गावर टोल माफीचे आश्वासन देऊ शकत नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले. जगभरात चांगल्या रस्त्यांसाठी टोल वसुली केली जाते, असे गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
वेळ आणि इंधन दोन्हींची चांगल्या रस्त्यांमुळे बचत होऊन सुरक्षित प्रवास शक्य होतो. त्यामुळे जर चांगल्या सेवा हव्या असतील तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल. गडकरींनी हे राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. मुंबई-पुणे प्रवासासाठी पूर्वीच्या काळी ९ तास लागायचे. या प्रवासादरम्यान चालकांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागायचा. पण महामार्गांमुळे आता हे अंतर २ तासांवर आल्याचा उल्लेखही गडकरी यांनी केला.
येत्या ५ वर्षांमध्ये रस्ते आणि महामार्ग मंत्रालय ८३,६७७ किलोमीटरचा महामार्ग तयार करणार आहे. या महामार्गासाठी ७ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्गाला वित्तीय पुरवठा करण्यासाठी देशांतर्गत तसेच जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गडकरी यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली.