व्हिएस न्यूज - भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने हैदराबादमध्ये सुरु असलेल्या ६५ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांनी बाद उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे पुरुष संघाने दुसरा सामना जिंकत स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. हैदराबाद येथील गचिबोवली जी.एम.सी. इनडोअर क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिलांनी उत्तरांचल संघाचा ५२-१६ अशा फरकाने सहज पराभूत केले. यापूर्वी महिला संघाने ओडीसाला ६५-१५ असे पराभूत केले होते.
या दोन्ही सामन्यात सायली जाधव, कोमल देवकर, अभिलाषा म्हात्रे, ललिता घरट, सुवर्णा बारटक्के यांनी चांगली कामगिरी केली. पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ५०-१९ धुव्वा उडवला. रिशांक देवाडीगा, नितीन मदने, विकास काळे, विराज लांडगे यांनी या सामन्यात चमकदार खेळी दाखवली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पौंडेचरी संघाविरुद्ध होणार आहे. या गटातून महाराष्ट्र गटविजेता म्हणून बाद फेरीत सहज प्रवेश करेल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.