व्हीएस न्यूज - जन्मापासून मोठे होईपर्यंत आईने केलेल्या पालनपोषणाबद्दल आईला भरपाई म्हणून सुमारे अमेरिकन 7 लाख 44 हजार अमेरिकी डॉलर देण्याचा आदेश तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
चू नावाच्या एका दंतवैद्याला न्यायालयाने हा आदेश दिला असून हा दंतवैद्य 41 वर्षांचा आहे. यापूर्वी एका खालच्या न्यायालयाने दिलेला आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानला आहे. विशेष म्हणजे या दंतवैद्य मुलाने 20वर्षांपूर्वी आईसोबत तिला ही भरपाई देण्याचा करार केला होता आणि त्या कराराचा मान राखण्यास न्यायालयाने त्याला सांगितले आहे.
लो असे या प्रकरणात दाद मागणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचा नवऱ्यासोबत 1990 मध्ये घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर तिने स्वतःच्या बळावर दोन मुलांना वाढविले होते. म्हातारपणी कोणी आपली काळजी घेणार नाही, या चिंतेने तिने दोन्ही मुले 20 वर्षांची झाल्यानंतर मुलांसोबत करार केला होता. या मुलांनी आपल्या उत्पन्नातून 60 टक्के वाटा तिला द्यावा, असे त्या करारात म्हटले होते. मात्र या मुलांचे संसार सुरू झाल्यानंतर त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर त्यांच्या मैत्रिणींनी आपल्या वकिलामार्फत तिला पत्र पाठवून त्यांना तसदी न देण्याची मागणी केली, अशी तिची तक्रार होती.
या दोघांनी आपल्या कराराचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर आठ वर्षांपूर्वी तिने खटला दाखल केला. मोठ्या मुलाने अखेर तिला काही रक्कम देऊन खटल्यात तडजोड केली. मात्र हा करार “चांगल्या चालीरीतीं”चे उल्लंघन करत असून मुलांना वाढविण्याचे मोजमाप पैशांत करता कामा नये, असे धाकट्या मुलाचे म्हणणे होते. या लहान मुलाने त्याच्या आईविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. खालच्या न्यायालयाचा निर्णय मुलाच्या बाजूने गेल्यानंतर लो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002