व्हीएस न्यूज – सरकार भीमा कोरेगावाच्या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना सोडून शांततेच्या मार्गाने होणारी विद्यार्थ्यांची सभा उधळून लावत असून विद्यार्थ्यांना उचलून तुरूंगात टाकत आहे. विद्यार्थ्यांना तुरूंगात टाकणारे हे सरकार नाकर्ते आहे, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली.
कपिल पाटील गुरूवारी मुंबईच्या पार्ले परिसरातील भाईदास सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या छात्र भारतीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांची भाषणे भाईदास सभागृहातील छात्र भारतीच्या संमेलनात या संमेलनात होणार होती. पण पोलिसांनी ऐनवेळी भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला परवानगी नाकारली. याला छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी अटक केली व उर्वरित विद्यार्थ्यांना परिसरातून हुसकावून लावले.
आमदार कपिल पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना संताप व्यक्त केला. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करायची सोडून विद्यार्थ्यांना सरकार अटक करत आहे. भिडे आणि एकबोटेंचे सरकार कौतुक करते. पण शांततेच्या मार्गाने होणाऱ्या सभा उधळून लावते. पोलिसांकडून आज सकाळपासून विद्यार्थ्यांना अटक केली जात आहे. पोलिसांनी सभेच्या स्टेजवरील सामानही उचलून नेले. विद्यार्थ्यांच्या सभा उधळणारे, त्यांना अटक करणारे सरकार हे नाकर्ते असते. सरकारने एक कार्यक्रम रोखला म्हणून दुसरा कार्यक्रम होणारच नाही, असे नव्हे. सरकारने खूप प्रयत्न केले तरी ते आमचे असे किती कार्यक्रम बंद पाडणार, असे कपिल पाटील यांनी म्हटले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002