व्हीएस न्यूज - लग्न होण्यापूर्वी एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या एका तरुणीचा व तिच्या वाग्दत्त वराचा खून केल्याची घटना पाकिस्तानात घडली आहे. या दोघांना एका उद्यानात गप्पा मारताना मुलीच्या काकाने पाहिले होते. ऑनर किलिंगची ही ताजी घटना असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
सिंध प्रांतातील नयी वाही गावात ही घटना घडली. नझीरन असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून शाहीद या तिच्या भावी नवऱ्यासोबत ती गप्पा मारत होती. या दोघांना पाहून तिच्या काकाचा राग अनावर झाला, असे एक्स्प्रेस न्यूज या वृत्तपत्राने म्हटले आहे. या प्रकरणी मुलीच्या दोन काकांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
ऑनर किलिंगच्या घटना पाकिस्तानात सर्रास घडत असून त्यातील बहुतांश घटनांत महिलांचा बळी जातो. गेल्या एका दशकात दरवर्षी सरासरी 650 ऑनर किलिंग होतात, असे पाकिस्तानच्या मानव हक्क आयोगाने (एचआरसीपी) आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक घटना पोलिसांपर्यंत पोचत नसल्याने खरा आकडा खूप अधिक असल्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानात दहशतवादात बळी पडणाऱ्या नागरिकांपेक्षा तथाकथित अनैतिक वागणुकीबद्दल जवळच्या कुटुंबियांच्या हातून अधिक महिला बळी पडतात, असेही या अहवालात म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002