व्हीएस न्यूज - नवीन वर्षाचा जरा वेगळा संकल्प फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केला आहे. त्यांनी फेसबुकचा दुरुपयोग होण्यापासून रोखण्याचा संकल्प केला आहे. झुकेरबर्ग २००९ पासून नवीन वर्षाचा संकल्प जाहीर करत आहेत. एका पोस्टद्वारे फेसबुकवरच त्यांनी २०१८चा संकल्प जाहीर केला आहे. यंदाचा संकल्प आधीच्या संकल्पांपेक्षा वेगळा आहे.
फेसबुकवरून अमेरिका आणि इतर देशांच्या निवडणुकीत तथाकथित खोट्या बातम्या पसरल्या गेल्या, अशी टीका फेसबुकवर झाली. विशेषत: २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाच्या बाबतीत राजकीय जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध झाल्या होत्या.
यावर्षीच्या काही ‘महत्त्वाच्या मुद्द्यांची’ यादी झुकेरबर्ग यांनी तयार केली आहे. यावेळी शिवीगाळ आणि द्वेषापासून लोकांना दूर ठेवणे, सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात आवाज उठवणे, तसेच फेसबुकवर घालवलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल याचा विचार करणे अशा मुद्द्यांवर विचार होईल, असे त्यांनी सांगितले आहे.