व्हीएस न्यूज - हिरा विकण्याची वेळ शिवाजीमहाराजांच्या वंशजावर म्हणजेच भोसल्यांवर आली होती. मुंबई गाठून त्यांनी हिऱ्याचा लिलावही सुरू केला. पण हे सर्वकाही माहेश्वरी समाजाच्या व्यापाऱ्याला बघवले नाही. लिलाव थांबवून त्याने भोसले कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत केली, असा दावा करत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी करत नव्या वादाला तोंड फोडले.
कलाग्राम येथे ‘महाराष्ट्र ट्रेड फेअर’चे महाराष्ट्र प्रदेश औरंगाबाद जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. जाजू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी हे वक्तव्य माहेश्वरी समाजाचे मोठेपण सांगताना केले. पण त्यांनी हिरा विकण्यासाठी गेलेला शिवाजी महाराजांचा ‘तो’ वारस कोण हे सांगितले नाही. त्यांनी फक्त ‘भोसले’ असाच उल्लेख केला.
कोणत्याही मातीत गेल्यावर तेथील समाजाशी एकरूप होऊन माहेश्वरी समाज व्यवसाय करतो. स्थानिकांच्या अस्मिताही जपतो. एकदा आपल्याकडील जुना अनमोल हिरा विकण्याची वेळ शिवाजी महाराजांच्या वंशजावर आली. हिरा विकण्यासाठी ते मुंबईच्या बाजारपेठेत आले. भोसले हिरा विकण्यासाठी स्वत: पुढे न जाता त्यांनी दुसऱ्याला पुढे केले. व्यापारी हिरा पाहून अचंबित झाले.
हिरा विक्रीसाठी ज्याने पुढे केला त्याला विचारले की, तुझ्यासोबत कोण आहे? त्यानंतर भोसले यांनी आपली ओळख दिली. हिऱ्याचा लिलाव काही वेळानंतर सुरू झाला. हिऱ्यासाठी ६२ लाख रुपयांपर्यंत बोली लागली होती. माहेश्वरी समाजाच्या एका व्यापाऱ्याने तेव्हा भोसले यांना बाजूला घेऊन तुम्हाला किती पैशांची गरज आहे, अशी विचारणा केली. भोसलेंनी ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. लगेच त्या व्यापाऱ्याने ५० लाख रुपये काढून त्यांना दिले. त्या बदल्यात भोसलेंकडून धनादेश घेतला नाही की कागदावर लिहून घेतले नाही. त्यानंतर भोसले यांनी लिलाव रद्द केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002