व्हीएस न्यूज - इराणमधील प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकवण्यावर बंदी घालण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कमी वयात इंग्लिश शिकल्याने मुले पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होतात, असे मत इस्लामिक नेत्यांनी व्यक्त केले आहे. प्राथमिक शाळांमध्ये इंग्लिश शिकण्याविरुद्ध इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर या बंदीबाबतची घोषणा इराणच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी केली. इराणची प्रमुख भाषा पारसी असून वयाच्या सहाव्या वर्षापासून येथील मुलांचे प्राथमिक शिक्षणाचे वय सुरु होते. या देशात इंग्लिश अधिकतर माध्यमिक विभागांमध्ये शिकवले जाते. १२ ते १४ वर्षातील वयोगटाच्या मुलांचा या विभागात समावेश असतो. मात्र इराणमधील काही प्राथमिक शाळांमध्येही इंग्लिश शिकवली जाते.