व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात येणार असून या निर्णयाचा परिणाम प्रशासनाची परवानगी न घेतलेल्या भोंग्यांवरच होईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मंदिर, मशीद आणि गुरुद्वारांचा शोध घेतला जात आहे. हा निर्णय तुम्हा-आम्हाला सामना करावा लागतो त्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवर वाजवले जातात. पण हा प्रकार आता उत्तर प्रदेशात बंद होणार आहे. परवानगीशिवाय धार्मिक स्थळांवर भोंगे लावता येणार नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिला आहे.
त्याचबरोबर उच्च न्यायालयाने हा नियम तोडणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशच्या मुख्य गृहसचिवांनी दिले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा या सर्व ठिकाणी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. लाऊडस्पीकर असे केल्यास जप्त केला जाईल, शिवाय कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागेल.
१० जानेवारीपर्यंत नियम मोडणाऱ्या स्थळांची ओळख पटवण्याची मुदत देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेकदा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरमुळे वाद आणि दंगलीही झाल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करतानाही वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सपा नेते आझम खान यांनी या निर्णयानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. नकारात्मक विचार सोडून भाजपने सकारात्मक विचार करणे गरजेचे असून जिथे सध्या लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत, तिथे परवानगी देण्यात यावी आणि यापुढे परवानगी अनिवार्य करावी’, अशी मागणी आझम खान यांनी केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002