व्हीएस न्यूज – सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या अहवालात न्यायमित्रांनी (एमीकस क्युरी) महात्मा गांधी यांच्या हत्येचा पुन्हा एकदा नव्याने तपास होणार नसल्याचे म्हटले आहे. माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केली होती. गांधी हत्याकांडाशी निगडीत विविध दस्तऐवजांचा त्यांनी तपास केला आणि सर्वोच्च न्यायालयाला गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस केली. नथुराम गोडसेनेच महात्मा गांधीची हत्या केली असून अज्ञात व्यक्तीचा यात हात नव्हता असे शरण यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शरण यांना यासंबंधीचे निर्देश अभिनव भारतचे पंकज फडणीस यांच्या याचिकेवर दिले होते. एका अज्ञात व्यक्तीने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. त्यांच्यावर ‘चौथी गोळी’ त्या अज्ञात व्यक्तीनेच झाडली होती. कधीच या चौथ्या गोळीचे रहस्य सुटले नाही, असा दावा करत पुन्हा नव्याने याचा तपास व्हावा अशी मागणी फडणीस यांनी आपल्या याचिकेत केली होती. शरण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला.