व्हीएस न्यूज - मराठा समाज किंवा ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने कुठलाही बंद नाही. जाणीवपूर्वक १० जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद असल्याचे काही व्हॉट्सअॅप मेसेज फिरविले जात आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. अफवा पसरवू नयेत, असे आवाहन सकल मराठा समाज आणि ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने करण्यात आले आहे.
भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर एका मराठा बांधवाला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच २ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी मराठा बांधवांवर जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत. यांच्या निषेधार्थ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन विभागीय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण ‘महाराष्ट्र बंद’ बाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे ‘मराठा क्रांती मोर्चा’चे समन्वयक विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी जाहीर केले आहे. मराठा समाजातील तरूणांचा वापर काही लोक राजकारणासाठी करू पहात आहेत. मराठा – दलित वाद पेटविण्याचे कारस्थान केले जात आहे. या कटकारस्थानाला कोणीही बळी पडू नये. मराठा समाजाला या दंगलीत उतरवून जातीय तेढ निर्माण करून मराठय़ांची चळवळ मोडीत काढण्याचे या मागे कारस्थान आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे लक्ष ठरलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या पोस्ट फिरवून आपल्या लक्ष्यावरून मराठय़ांना विचलित करण्याचा प्रयत्न काही शक्ती करीत आहेत. दंगली पेक्षा आमच्या मुलांना आरक्षण, संरक्षण, शिक्षण, नोकरी,उद्योग, व्यवसाय या कडे लक्ष देणे गरजेच आहे. ‘मराठा क्रांति मोर्चा’ व ‘सकल मराठा समाजा’चे नाव वापरून कोणी खोटी पोस्ट टाकत असेल तर अशा व्यक्तीला तिथेच जाब विचारून पुढे पोस्ट जावून समाजात दुही पसरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोखरकर यांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002