व्हीएस न्यूज - चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या मदतीसाठी पक्षाचे कार्यकर्ते तुरुंगात पोहोचले आहेत. चोरीच्या गुन्ह्याखाली राजदच्या दोन कार्यकर्त्यांना अटक झाली असून तुरुंगांत लालूंपर्यंत पोहोचता यावे यासाठी त्यांनी हा कथित गुन्हा केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मदन यादव आणि त्याचा साथीदार लक्ष्मण यादव या दोघांना रांची पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. या दोघांवर सुमित यादव या तरुणाकडील १० हजार रुपये चोरल्याचा आरोप आहे. पोलीस तपासात उघड झालेली माहिती मात्र चक्रावून टाकणारी आहे. मदन यादव या सधन कुटुंबातील आहे. त्याचे अलिशान घर असून त्याच्याकडे एसयूव्ही कारदेखील आहे. हे दोघेही राजदचे कार्यकर्ते असून लालूंचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे हे दोघे १० हजार रुपयांची चोरी करतील का, असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे. तुरुंगात लालूंपर्यंत पोहोचता यावे आणि तिथे लालूंची मदत करता यावी यासाठी त्यांनी स्वतःला गुन्ह्यात अडकवले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.