व्हीएस न्यूज – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एका वयोवृद्ध दाम्पत्याने इच्छामरणाला परवानगी देण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पती-पत्नीची नारायण लवाटे आणि इरावती लवाटे अशी नावे आहेत.
नारायण लवाटे यांचे वय ८६ वर्षे असून १९८९ मध्ये ते एसटी महामंडळाच्या अकाऊंट विभागातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पत्नी इरावती या गिरगावातील एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. लवाटे दाम्पत्याला मूलबाळ नसून त्यांनी आतापर्यंत सुखाने संसार केला. त्या दोघांनाही सोबत मृत्यू मिळावा, यासाठी त्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाच्या परवानगीसाठी पत्र लिहिले आहे.
लवाटे दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी लावून धरली आहे. ते गेली ३० वर्षे इच्छामरणाचा कायदा व्हावा, यासाठी धडपडत आहेत. पण त्यांना पाठपुरावा करुनही काही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. आता आम्हाला सध्या कोणता आजार किंवा व्यंग नाही. एकटे जगण्यापेक्षा किंवा आमचा दुसऱ्यांना त्रास होण्यापेक्षा मरण बरे. आमच्या कुटुंबात कुणी नाही, असे नारायण लवाटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मी शिक्षिका होते. माझ्या दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता माझ्या जगण्याला काही अर्थ उरला नाही अशी प्रतिक्रिया इरावती लवाटे यांनी दिली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002