व्हीएस न्यूज – एकनाथ खडसे भोसरी एमआयडीसी जमीनप्रकरणी राजीनाम्यानंतर भाजप श्रेष्ठींवर नाराज असून राष्ट्रवादीत नाराज खडसे प्रवेश करणार असल्याच्या वावड्या देखील उठवल्या जात आहेत. त्यांनी यापूर्वीच अजित पवारांची भेट घेतली असताना आता पुन्हा एकदा खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांसह अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
खडसे म्हणाले, आजही आपण कृषीमंत्री असताना शरद पवारांनी केलेल्या कामाबद्दल प्रभावित आहोत. त्याचबरोबर आपल्यावर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या कामाचा ठसाही असल्याचे खडसे म्हणाले. बारामतीत आपल्याला काही दिवस जाऊन थांबावेसे वाटते. आपल्याला पवार हे नवीन नाहीत. पण उद्याचे काहीही सांगता येणार नाही, अशी गुगली टाकत आपण सगळे काही स्वतःच्या ताकदीवर उभे केले आहे. त्यामुळे आपले काहीही झाकून राहत नाही, असेही खडसे यावेळी म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आपले सरकार असले तरी आपण सरकारच्या कामावर अजिबात समाधानी नसल्याची टीका माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. शेतीची अवस्था अतिशय खराब असून आपल्यालाही त्याचा फटका बसत आहे. ज्या वेगाने शेतीचा विकास व्हायला हवा होता, तो या सरकारकडून होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारच्या विश्वासावर विसंबून राहू नका, असे सांगत खडसेंनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. मी मंत्रीमंडळात असलो काय आणि नसलो तरी, त्यात काय वेगळे नाही. परंतु निर्णयक्षमता असलेली माणसे मंत्रीमंडळात नाहीत, असाही टोला खडसे यांनी लगावला. दरम्यान, अजित पवार हे निर्णय क्षमता असणारे नेते असल्याचीही कडी खडसे यांनी भाजप नेत्यांवर यावेळी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002