व्हीएस न्यूज - सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईजवळील भाईंदरमध्ये लँडिंग करत असताना हा प्रकार घडला. या हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले. सतर्कतेमुळे हा अपघात सुदैवाने टळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या भूमिपूजनासाठी मीरा भाईंदर येथे आले होते. पण त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर केबलमुळे इतरत्र भरकटले आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेला ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दुजोरा दिलेला नाही. त्यांनी कॅमेरासमोर बोलण्याचे टाळले आहे. हे हेलिकॉप्टर आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेच्या प्रांगणात उतरवण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटारीने प्रयाण केले.