व्हीएस न्यूज - राज्यातील विविध कौटुंबिक न्यायालयांमध्ये ३४ हजार ३५९ दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या आकडेवारीमध्ये पुणे कौटुंबिक न्यायालय राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ५,१९७ दावे प्रलंबित आहेत, तर सर्वाधिक दावे मुंबईच्या वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत.
राज्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ३४ हजार ३५९ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये दिवाणी स्वरूपाचे २५,१८६ दावे, तर फौजदारी स्वरूपाचे ९,१७३ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या दिवाणी स्वरूपाचे २०३, फौजदारी स्वरूपाचे २८५ असे मिळून एकूण ४८८ दाव्यांचा समावेश आहे. महिलांनी दाखल केलेल्या दिवाणी स्वरूपाच्या १०,६०१, फौजदारी स्वरूपाच्या ८,०५८ अशा मिळून एकूण १८ हजार ६५९ दाव्यांचा समावेश आहे.
प्रलंबित असलेल्या दाव्यांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले २९ दावे आहेत, तर पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रलंबित असलेले ६१४ दावे आहेत. दोन ते पाच वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेले ७,४७७ दावे प्रलंबित आहेत. दोन वर्षांपेक्षा कमी काळ प्रलंबित असलेले २६,२३९ दावे राज्यात प्रलंबित आहेत. पुणे कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ५,१९७ दावे प्रलंबित आहेत.
यामध्ये महिलांनी दाखल केलेले दिवाणी स्वरूपाचे १६५८, फौजदारी स्वरूपाचे १०२० अशा मिळून २,६७८ दाव्यांचा समावेश आहे. दहा वर्षाहून अधिक काळ पुण्यात प्रलंबित असलेले दावे सध्या केवळ पाच आहेत. पाच ते दहा वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेल्या १२२, दोन ते पाच वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेले ११४८, तर दोन वर्षांहून कमी काळ प्रलंबित असलेले ३९२२ दावे सध्या प्रलंबित आहेत.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयासाठी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर न्यायालयात दाखल होणा-या दाव्यांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ कौटुंबिक न्यायालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणा-या वकिलांना यापूर्वी असलेल्या कौटुंबिक न्यायालयात ये-जा करताना अडचणी येत असत. मात्र, हा प्रश्न सोडवण्यात आला आहे.
कौटुंबिक न्यायालयात सध्या दररोज १५ ते १६ दावे दाखल होत आहेत. न्यायालयात वाढत्या दाव्यांची संख्या लक्षात घेऊन न्यायाधीशांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, असे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002