व्हीएस न्यूज - पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपलेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री निधी उपलब्ध करून देत नाहीत. मी काय करू, असे हताश उद्गार त्यांनी काढले.
कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना निधी मिळण्याच्या मागणीसाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी बबनराव लोणीकर यांना औरंगाबाद विमानतळावरच घेराव घातला. ४ वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. योजनेची कामे कधी सुरू करणार, असा सवाल करीत ग्रामपंचायत सदस्यांनी लोणीकर यांना धारेवर धरले. तेव्हा लोणीकर यांनी अत्यंत हतबला व्यक्त केली. ते म्हणाले की, कुठलेही काम सुरू झालेले नाही. कर्जमाफीमुळे कामे होण्यास विलंब होतो आहे. ४ वर्षांपासून कर्जमाफी सुरू आहे काय, असा सवाल हर्षवर्धन जाधव यांच्यासह शेतक-यांनी केला. त्यावर ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील देखील काम झालेले नाही. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पैसे देत नाहीत. त्यांनी पैसे दिल्याशिवाय मी तरी काय करू शकतो. विधानसभा अध्यक्षांचे काम होत नव्हते. ते स्वत: मुख्यमंत्र्यांना बोलले होते. १०० कोटी शहरनिहाय दिले जातात. २०० कोटी एका जिल्ह्याला मिळणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले होते. ७०० कोटी रुपयांची घोषणा पाणीपुरवठा योजनांसाठी झाली; परंतु प्रत्यक्षात २१० कोटीच मिळाले, अशी वस्तुस्थिती पाणीपुरवठामंत्र्यांनी मांडली. उन्हाळ्याच्या तोंडावर हा सगळा प्रकार घडल्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण यंदाही कायम राहणार असल्याचे दिसते.
शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, असे असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे अशा अधिका-यांवर कारवाई करण्याचे संकेत पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ७ जानेवारी रोजी जालना येथे घेतलेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री निधी देत नसल्याचे सांगून सरकारला घरचा अहेर दिला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002