व्हीएस न्यूज - दलित आणि ओबीसी समाज भाजप सरकारवर नाराज आहे. तरुणांमध्ये तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असंतोष धुमसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका या वर्षांतच होतील आणि त्यात भाजपचा दारुण पराभव होईल, असे भाकीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव फेटाळून लावताना, आठवले यांच्यात नेतृत्वाची बौद्धिक क्षमताच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात ते बोलत होते.
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीबद्दल आपली ठोस व अभ्यासपूर्ण मते मांडली. ‘आंबेडकरी चळवळ चालविण्यासाठी मी सक्षम आहे, यापुढील राजकारणाचा राष्ट्रीय अजेंडा माझा असेल,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. सार्वत्रिक निवडणुका याच वर्षी होतील आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची जी अवस्था झाली, तशी भाजपची होईल, असेही ते म्हणाले.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले, दगडफेक,जाळपोळ करण्यात आली, त्याच्या निषेधार्थ आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या वेळी नागरिकांचे हाल झाले, याकडे आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी बंद पुकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. भीमा कोरेगावमधील हल्ल्यानंतर दलित समाजातून तीव्र उद्रेक बाहेर आला. त्याला महाराष्ट्र बंदची हाक देऊन संघिटत करुन दलितांच्या भावनाना मोकळी वाट करुन दिली. तसे केले नसते तर हा उद्रेक हाताबाहेर जाऊन त्याचे विपरित परिणाम झाले असते, अशा शब्दात त्यांनी बंदचे समर्थन केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002